पुणे(प्रतिनिधी) : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगात आली असून सर्वत्र प्रचार, बैठका आणि राजकीय गणितांची लगबग पाहायला मिळत आहे. मात्र, या धावपळीच्या वातावरणातही प्रभाग क्रमांक २४ ‘ड’ चे उमेदवार तथा माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राजकारणापलीकडची जिव्हाळ्याची नाती जपत एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन बिडकर यांनी आज त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली.

स्व. मोहनसिंग राजपाल यांच्या आठवणींना उजाळा
गणेश बिडकर यांनी सर्वप्रथम दिवंगत माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या निवासस्थानी जाऊन राजपाल कुटुंबीयांची भेट घेतली. मोहनसिंग राजपाल हे पुण्याचे महापौर असताना गणेश बिडकर यांना स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी भावना व्यक्त करताना बिडकर म्हणाले की, “स्वर्गीय मोहनसिंग राजपालजी यांचा प्रदीर्घ अनुभव, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि त्यांचा संयमी स्वभाव मला जवळून अनुभवता आला. पुण्याचे पहिले शीख महापौर म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय आजही शहराच्या विकासासाठी दिशादर्शक आहेत.”
थोपटे आणि बारणे कुटुंबीयांशी साधला संवाद
राजपाल कुटुंबीयांनंतर गणेश बिडकर यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक स्व. सीतारामभाऊ थोपटे तसेच माजी नगरसेविका स्व. शोभाताई बारणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. निवडणुकीच्या काळात राजकीय मतभेद बाजूला सारून केवळ आपुलकी आणि आदरापोटी घेतलेल्या या भेटींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सर्व स्तरांतून कौतुक
निवडणूक म्हणजे केवळ सत्ता संघर्ष आणि आकडेमोड नसून, शहराच्या जडणघडणीत ज्यांनी आयुष्य वेचले अशा नेत्यांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांशी स्नेह जपणे ही आपली संस्कृती असल्याचे बिडकर यांनी या कृतीतून दाखवून दिले. राजकारणापलीकडे जाऊन माणुसकी आणि जिव्हाळ्याची नाती जपणाऱ्या गणेश बिडकर यांच्या या भूमिकेचे शहरात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
