
पिंपरी चिंचवड : सांगवी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयात राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य कै. आबासाहेब जंगले सर यांची जयंती आणि शिक्षक गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

संस्थेचे अध्यक्ष मा. पोपटराव भसे आणि कै. सरांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सोमलता जंगले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी प्रास्ताविक करताना, कै. आबासाहेब जंगले सरांच्या तीस वर्षांच्या शैक्षणिक सेवा, शिस्त, संस्कार आणि तीन मजली शाळा इमारत उभारणीतील योगदानाचा गौरव केला. यावेळी सचिव तुळशीराम नवले, जयप्रकाश जंगले व डॉ. दिलीप गरुड यांनी आपल्या मनोगतातून सरांच्या आठवणींना उजाळा दिला.
शिक्षण दिनाचे औचित्य साधून शिक्षक-पालक संघातर्फे शाळेतील सर्व शिक्षकांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. जंगले परिवारातर्फे शाळेला ५०,००० रुपयांचे संगीत साहित्य (स्पीकर, पखवाज, पेटी, टाळ) भेट देण्यात आले आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तात्रय जगताप यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
