
पुणे (पब्लिक वाईस वृत्तसेवा): पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली पहिली चाल अत्यंत प्रभावीपणे टाकली आहे. महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आज प्रभाग क्रमांक २४ मधून शहरातला भाजपचा पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे, अद्याप अनेक पक्षांची अधिकृत यादी जाहीर झालेली नसताना, बिडकरांनी ‘एबी’ फॉर्मसह अर्ज भरून मैदानात आघाडी घेतली आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार हेमंत रासने प्रामुख्याने उपस्थित होते. बिडकर यांच्यासोबत त्यांच्या प्रभागातील इतर तीन उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल करत महायुतीची ताकद दाखवून दिली.
“पुणेकर पुन्हा भाजपलाच कौल देणार” – गणेश बिडकर
अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना गणेश बिडकर यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले:
”लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपवर जो विश्वास दाखवला, तोच ओघ महापालिका निवडणुकीतही कायम राहील. पुण्याचा विकास जागतिक स्तरावर नेण्याचे आमचे स्वप्न आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि भविष्यात पुण्याला आधुनिकतेच्या शिखरावर नेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
बिडकर ठरले भाजपचे ‘फर्स्ट ओपनर’
पुणे शहरात भाजपची अधिकृत उमेदवारी मिळवून अर्ज दाखल करणारे बिडकर हे पहिले उमेदवार ठरले आहेत. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला हा विश्वास पुणे महापालिकेत महायुतीचे वर्चस्व कायम राखण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापूर्वीच बिडकरांनी प्रचारात आघाडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पब्लिक वाईस: पुणे महानगरपालिका निवडणूक विशेष अपडेट्ससाठी पाहत राहा आमचे पोर्टल.
