पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणांगणात भारतीय जनता पक्षाने आता आपली पूर्ण ताकद झोकली आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली बहुप्रतीक्षित यादी रविवारी (दि. २८ डिसेंबर) प्रसिद्ध करण्यात येईल, अशी महत्त्वाची माहिती निवडणूक प्रचार प्रमुख आणि आमदार शंकर जगताप यांनी दिली. शुक्रवारी (दि. २६) पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची रणनीती आणि तयारी स्पष्ट केली.
कोअर कमिटीचा निर्णय अंतिम
आमदार शंकर जगताप म्हणाले की, “महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रत्येक विधानसभेनुसार उमेदवारांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित आहे, त्यांना अंतिम मान्यता मिळाली असली, तरी अंतिम घोषणा पक्षश्रेष्ठींकडूनच केली जाईल.”
निष्ठावंतांची चिंता मिटली
पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून धाकधूक असताना जगताप यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. “भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंतांना नेहमीच सन्मान दिला जातो. सर्वेक्षणानुसार ज्यांच्याकडे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ (निवडून येण्याची क्षमता) आहे, त्यांनाच संधी दिली जाईल. पण हे करताना कोणाही निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी पक्ष घेईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
‘थम्पिंग मेजॉरिटी’ने विजयाचा विश्वास
”निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या बळावर जिंकली जाते. तिकीट मिळेपर्यंत नाराजी असणे स्वाभाविक आहे, पण एकदा पक्षाचा आदेश आला की सर्व कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागतील,” असा विश्वास शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
”प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या ब्रीदवाक्यानुसार भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. विरोधकांच्या हालचालींचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा करत जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप ‘थम्पिंग मेजॉरिटी’ (प्रचंड बहुमताने) पुन्हा एकदा कमळ फुलवेल.

