
किवळे, मामुर्डी, रावेत भागात उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्रांची सुविधा पुरवा – आमदार शंकर जगताप
कल्पतरू सोसायटी, काळेवाडी एम.के. चौकातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मिळणार दिलासा
मिसिंग लिंक भूसंपादन, निधी तरतुदीबाबत प्रशासनाला आमदार शंकर जगताप यांच्याकडून निर्देश
पिंपरी, २८ नोव्हेंबर (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी येथे अंडरपास आणि काळेवाडी येथील एम.के. चौक येथे ग्रेड सेपरेटर प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिल्या आहेत. शुक्रवारी (दि. २८) झालेल्या बैठकीत त्यांनी या भागातील ‘मिसिंग लिंक’ जोडून नागरिकांना पर्यायी वाहतूक रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
यावेळी केवळ वाहतूक नव्हे, तर पवना नदी सुधार प्रकल्पाला (Pavana River Improvement Project) चालना देण्याचेही निर्देश आमदार जगताप यांनी प्रशासनाला दिले. नदीचे आरोग्य हे निरोगी शहराचे लक्षण असल्याचे सांगत त्यांनी प्रकल्पासाठी निधीची अडचण न येऊ देण्याची ग्वाही दिली.
वाहतूक कोंडीवर ‘अंडरपास’, ‘ग्रेड सेपरेटर’चा उपाय
चिंचवड मतदारसंघात पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी आणि रहाटणी या भागांत वाढलेल्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि अंडरपास असे सक्षम पर्याय उभे केले जाणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले.
या कामांचा घेतला आढावा:
- पिंपळे सौदागर पी.के. चौक येथील उड्डाणपूल.
- स्वराज्य चौक, काळेवाडी एम.के. चौक येथील ग्रेड सेपरेटर.
- पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी अंडरपास.
याशिवाय, विविध भागांतील ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये पवना नदीकाठचा रस्ता, मोरया स्टेडियमकडील रस्ता आणि वाकड येथील टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेल मागील गोल्ड फिंगर सोसायटी लगतचा भाग जोडल्यास वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा दूर होईल, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांसाठी मूलभूत सुविधा महत्त्वाच्या
किवळे, मामुर्डी, रावेत यांसारख्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या भागात नागरिकीकरण वाढले आहे. त्यामुळे या भागांमध्ये तातडीने उद्यान, रस्ते, विरंगुळा केंद्रे आणि नागरी सुविधा केंद्रे विकसित करून मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देशही आमदार जगताप यांनी आयुक्तांना दिले.
दरम्यान, पवना नदी सुधार प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती आमदार जगताप यांनी बैठकीनंतर दिली.
निवेदक: शंकर जगताप (आमदार, भाजपा पिंपरी चिंचवड शहर)
