पुणे : पुणे महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतील जन्म-मृत्यू नोंदणी विभागासाठी जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या महापालिकेच्या बोधचिन्हासह वॉटरमार्क पेपर खरेदी करण्यासाठी ३४ लाख ३५ हजार रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
या खरेदीसाठी ‘मे. नमन एंटरप्रायझेस, पुणे’ यांचा सर्वात कमी दर आल्याने त्यांच्याकडून जीईएम पोर्टलच्या कार्यपद्धतीनुसार खरेदी करण्याची शिफारस प्रशासनाने केली आहे.
महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार कार्यालयामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांच्या प्रशासकीय मान्यतेनंतर खरेदी उच्चाधिकार समितीमार्फत निविदा मागविण्यात आल्या होत्या.
प्रशासनाच्या प्रस्तावानुसार १५ लाख नग ए-४ आकाराचे, १०० जीएसएम दर्जाचे, महापालिकेच्या लोगोची एकरंगी छपाई असलेले वॉटरमार्क पेपर खरेदी करण्यात येणार आहेत. या कागदासाठी बिंदल, टीएनपीएल किंवा जेके या उत्पादक कंपन्यांचा कागद वापरण्याची अट ठेवण्यात आली आहे.
सदर निविदेतील दर बाजारभावाशी सुसंगत असल्याचे प्रशासनाने नमूद केले असून या खर्चासाठी सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात आवश्यक निधी उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. वित्तीय समिती तसेच खरेदी उच्चाधिकार समितीने या प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी विषय स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता.
