Share this post:

पिंपरी : मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका निष्पाप कामगाराचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि संबंधित कंत्राटदाराचा भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप करत, राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी केली आहे.


​प्रशासकीय ‘दुकानदारी’मुळे गरिबांचा बळी!
या दुर्घटनेबाबत बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, “मोशी येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून इमारत कोसळली. या दुर्घटनेत २३ जण अडकले होते, त्यापैकी १५ जणांची सुटका करण्यात यश आले आहे, मात्र एकाचा मृत्यू झाला असून अजूनही ८ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान जीव धोक्यात घालून बचाव कार्य करत आहेत. परंतु, महापालिकेने वेळेत यंत्रणा पुरवली असती, तर आज अनेक निष्पाप कामगारांचे जीव वाचले असते.”


​आयुक्तांच्या दाव्यावर वाघेरे यांचा थेट सवाल
पालिका प्रशासन या दुर्घटनेला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणत आहे. यावर संताप व्यक्त करत वाघेरे म्हणाले की, “पावसाळ्यापूर्वी महापालिकेला कचरा डेपोच्या धोक्याची कल्पना नव्हती का? केवळ पर्यावरणाच्या नावाखाली ‘दुकानदारी’ करणारे पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी, आल्हाट आणि ठेकेदार एंथनी नक्की काय करत होते? त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली आहे.”


​संदीप वाघेरे यांच्या प्रमुख मागण्या:
​सदोष मनुष्यवधाचा गुन्हा: पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी, आल्हाट आणि संबंधित कंत्राटदार एंथनी यांच्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
​निलंबनाची कारवाई: बायोमायनिंगच्या नावाखाली जनतेच्या कराचे लाखो रुपये उधळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे.


​उच्चस्तरीय चौकशी: बायोमायनिंग प्रकल्पातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी.
​पिंपरी-चिंचवडकरांच्या कराच्या पैशातून बायोमायनिंगवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही निष्पन्न काहीच झाले नाही, उलट महापालिकेची नामुष्की ओढवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशाराही संदीप वाघेरे यांनी दिला आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »