Share this post:

मुंबई | (राजेश्री पवार 8668371826)

महाराष्ट्राच्या राजकारणात पांढरा सदरा, पायजमा आणि डोक्यावर गांधी टोपी अशा अत्यंत साध्या वेषात वावरणारे ‘लोकनेते’ म्हणजे नरहरी झिरवाळ. पण आज याच साध्या माणसाच्या मंत्रिपदावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचे काळे ढग जमा झाले आहेत. मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात लाचेची जी ‘लाईन’ पकडली गेली, त्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

काय आहे ते ‘लाईन’ प्रकरण?

​काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील झिरवाळ यांच्या दालनालगत असलेल्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक धाड टाकली. राजेंद्र ढेरंगे नावाच्या लिपिकाला ३५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. वरकरणी हे प्रकरण एका छोट्या कर्मचाऱ्याचे वाटत असले, तरी तपासात समोर आलेले ‘कोडवर्ड्स’ धक्कादायक होते. या कार्यालयात फाईल पुढे सरकवण्यासाठी ‘लाईन’ हा शब्द वापरला जात असे. ‘एक लाईन’ म्हणजे ५० हजार आणि ‘दोन लाईन’ म्हणजे १ लाख रुपये! एका मेडिकल स्टोअरचा परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी ही मांडवली सुरू होती.

संशयाची सुई पीए आणि मंत्र्यांकडे?

​केवळ लिपिकापर्यंत हे प्रकरण थांबले नाही. अटक झालेल्या कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांच्या जवळच्या माणसांची नावे घेतल्याने संशयाची सुई थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचली. झिरवाळ यांचे खाजगी सचिव डॉ. रामदास गाडे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली असली, तरी विरोधकांचे समाधान झालेले नाही.

विधानसभेत विरोधक आक्रमक: “नैतिकता कुठे आहे?”

​आज विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी रान पेटवले. “मंत्रालयात भ्रष्टाचार चालतो आणि मंत्री शांत कसे?” असा सवाल अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विचारला. “जर कनिष्ठ कर्मचारी मंत्र्यांच्या नावाने पैसे उचलत असतील, तर मंत्र्यांची त्यावर पकड नाही किंवा त्यांचा यात छुपा पाठिंबा आहे,” असा थेट आरोप विरोधकांनी करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

झिरवाळ यांचा पवित्रा: “पुरावा द्या, मी राजीनामा देतो!”

​दुसरीकडे, नरहरी झिरवाळ यांनी आपली बाजू मांडताना अत्यंत आक्रमक आणि भावूक पवित्रा घेतला आहे. “मी आयुष्यभर गरिबी पाहिली आहे, आदिवासींच्या हक्कांसाठी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या घेतल्या आहेत. जर या भ्रष्टाचाराची लिंक माझ्यापर्यंत पोहोचली, तर मी कोणाचीही वाट न पाहता १०० टक्के राजीनामा देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तूर्तास झिरवाळ यांची पाठराखण केली आहे.

​एकीकडे ‘साधी राहणी’ असलेले झिरवाळ आणि दुसरीकडे त्यांच्याच विभागात फुटलेला ‘भ्रष्टाचाराचा फोड’. हे प्रकरण केवळ एका लिपिकापुरते मर्यादित आहे की या ‘लाईन’चे धागेदोरे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यापर्यंत पोहोचले आहेत, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी, नरहरी झिरवाळ यांच्या राजकीय कारकिर्दीतील ही सर्वात मोठी अग्निपरीक्षा मानली जात आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »