
पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल (प्रभाग क्रमांक 24) येथे भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठे बळ मिळाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांनी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीच्या गडाला मोठे खिंडार पडले असून, भाजपचा विजयमार्ग अधिक सुकर झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) ‘या’ नेत्यांचा समावेश
गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील राजकीय वातावरण ढवळून काढले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांनी कमळाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे:
- वनिता विश्वास जगताप: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उपाध्यक्ष
- अमर सुभाष कोरे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सरचिटणीस
- आयेशा अमर कोरे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या सदस्या
या प्रमुख नेत्यांसह अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली आहे.
विकासाचे नेतृत्वच प्रवेशाचे कारण
प्रवेश केलेल्या नेत्यांनी प्रभागात सामाजिक आणि राजकीय कार्यात लक्षणीय भूमिका बजावली आहे. वनिता जगताप या अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत, तर अमर कोरे आणि आयेशा कोरे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्थानिक उपक्रम राबवले होते.भाजपमध्ये प्रवेश करताना पदाधिकाऱ्यांनी आपली भावना स्पष्ट केली. “गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेली विकासकामे, कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या संस्थांमधील सुविधा वाढवण्यावर दिलेला भर, आणि ‘लाईट हाऊस’ उपक्रमातून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न… हेच विकासाभिमुख नेतृत्व आम्हाला भाजपमध्ये घेऊन आले,” असे मत प्रवेशकर्त्या नेत्यांनी व्यक्त केले.गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपने आता प्रभाग 24 मध्ये आपली पकड अधिक मजबूत केली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी हा प्रवेश मोठा धक्का मानला जातो
Read more: प्रभाग 24 मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार गटाचे प्रमुख नेते भाजपमध्ये दाखल; बिडकरांना मिळाले मोठे बळ.