राजश्री आतकरे पवार (8668371826)
पिंपरी-चिंचवड: राज्याच्या राजकारणात ‘महायुती’चा गाडा एकत्र धावत असला, तरी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आखाड्यात मात्र चित्र पूर्णपणे वेगळे दिसू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरीत भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपली रणनीती बदलली आहे. पिंपरी-चिंचवडचा आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी अजितदादांनी आता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

भाजपचा ‘मेगा प्लॅन’ आणि मेगाभरती
भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये आपली सत्ता कायम राखण्यासाठी ‘मिशन १०० पार’चा नारा दिला आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संजोग वाघेरे आणि काँग्रेसचे काही बडे नेते यांचा समावेश असल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपने अण्णा बनसोडे यांच्या मुलालाही ऑफर दिल्याची चर्चा रंगली होती, मात्र बनसोडे यांनी अजितदादांशी एकनिष्ठ राहण्याचे जाहीर केले आहे.
अजितदादांचे ‘पुणे-पिंपरी’ कार्ड

भाजप आणि शिंदेंच्या सेनेने ‘मैत्रीपूर्ण लढती’चे संकेत दिल्यानंतर अजित पवार यांनी आपले जुने मित्र आणि विरोधक असलेल्या काँग्रेसशी संपर्क साधला आहे. त्यांनी सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ (अजित पवार आणि शरद पवार गट) एकत्र येण्याची शक्यता शशिकांत शिंदे आणि सुभाष जगताप यांच्या विधानांवरून गडद होत आहे. २५ किंवा २६ डिसेंबरला याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
‘घराणेशाही’चे पेच आणि तिकीट वाटप
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी ५ हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. विशेष म्हणजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे आणि आमदार उमा खापरे यांसारखे दिग्गज नेते आपल्या मुलांसाठी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून नेत्यांच्या मुलांना तिकीट दिल्यास भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये बंडाळी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे:
- अर्ज भरण्याची मुदत: २३ ते ३० डिसेंबर २०२५
- अर्जाची छाननी: ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी माघारी: २ जानेवारी २०२६
- मतदान: १५ जानेवारी २०२६
- निकाल: १६ जानेवारी २०२६
थोडक्यात महत्त्वाचे:
१. भाजप-शिंदे सेना: अधिकृत युतीचे संकेत.
२. अजित पवार गट: काँग्रेस आणि शरद पवार गटाशी आघाडीसाठी प्रयत्नशील.
३. समाजवादी पार्टी: ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात.
पिंपरी-चिंचवडचा ‘दादा’ कोण ठरणार, की भाजप पुन्हा एकदा कमळ फुलवणार, याचा फैसला आता १५ जानेवारीला मतपेटीतून होणार आहे.
