
पिंपरी, २५ नोव्हेंबर (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा आमदार शंकर जगताप यांनी केली आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन निगडी, मुकाई चौक ते किवळे परिसर हा आगामी काळात “मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब” म्हणून विकसित करण्यात येणार आहे.

🛣️ निगडी-किवळे बीआरटी मार्गावर बससेवा सुरू
पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या निगडी ते मुकाई चौक, किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा आता सुरू करण्यात आली आहे. निगडी भक्तीशक्ती चौक ते ट्रान्सपोर्ट नगर मार्गे मुकाई चौकपर्यंतच्या या नव्या मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
या मार्गावर धावणाऱ्या काही प्रमुख बससेवा:
- निगडी ते आकुर्डी स्टेशन (बस क्र. ३०३)
- निगडी ते गहुंजे (बस क्र. ३०३अ)
- निगडी ते मुकाई चौक (बस क्र. ३६५)
- भोसरी ते मुकाई चौक (बस क्र. ३६७)
📈 वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर
- फास्ट ट्रॅक कॉरिडॉरचे नियोजन: निगडी – मुकाई चौक, किवळे ते वाघोली दरम्यान साधारण ३२ किलोमीटरचा ‘फास्ट ट्रॅक कॉरिडॉर’ विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे आयटी हब असलेल्या वाघोली, औंध, हिंजवडी या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
- बंद केलेले मार्ग पुन्हा सुरू करण्याचे निर्देश: मुकाई चौक ते भक्ती-शक्ती बीआरटी रस्ता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यामुळे, बंद झालेले किवळे ते लोहगाव विमानतळ, स्वारगेट, आळंदी, चाकण एमआयडीसी, आणि देहूरोड ते पिंपरीगाव या मार्गावरील बससेवा तातडीने तसेच सकाळ-सायंकाळ किवळे ते हिंजवडी फेज-३ या मार्गावर जास्तीत जास्त बसेस सुरू करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला दिले आहेत.
- सुरक्षित आणि जलद सेवा: नागरिकांना जलद, सक्षम आणि सुरक्षित वाहतूक सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट केले आहे. सुरुवातीला १६ बसेस सोडल्या जातील, प्रवासीसंख्या वाढल्यास बसेसची संख्या वाढवण्याची तयारी पीएमपीएमएलने दर्शवली आहे.
🛑 खाजगी वाहनांना मनाई
या नव्या बीआरटी लेनमध्ये खाजगी गाड्यांची घुसखोरी होऊ नये यासाठी प्रशासनाला सक्त ताकीद देण्यात आली आहे. समर्पित बस लेनमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास सुरळीत होईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे.
प्रवाशांना दिलासा: मुकाई चौक – किवळे हे मुंबई-बंगळुरू बायपासवरील प्रवेशद्वार असल्याने, मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी या नव्या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे.
