पुणे : नागरिकांचे आर्थिक व्यवहार हे बहुतांशी ऑनलाइन पद्धतीकडे वळल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा ऑनलाइन गुन्हेगारीकडे वळविल्याचे दिसून येते. शहरात दिवसाकाठी 70 ते 80 तक्रार अर्ज दाखल होतात. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या सायबर पोलीस ठाण्यावर मोठा ताण येतो. सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात सायबर पोलिस स्टेशन उभारणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ सॅलिस्बरी पार्क परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रवीण चोरबोले, डॉ. भरत वैरागे, बंटी मोकळ, देवेंद्र बनसोडे, सुनील इंगळे, प्रसन्न वैरागे, निखिल शिळीमकर, उमेश शहा, सिद्धार्थ चिंचोळकर, किरण रामसिन्हा, राजेंद्र सरदेशपांडे, गणपत मेहता, पूजा जोशी, संगीता कांबळे, वंदना गावडे, रेणुका पाठक,अनिल भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर गुन्हेगारांच्या नवनवीन क्लुप्त्या पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. गंभीर गुन्हे हाताळण्यासाठी 30 पोलिस ठाणी आणि संपूर्ण गुन्हे शाखा काम करते. मात्र गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांची संख्या दुप्पट असूनही त्याचा ताण केवळ एकाच सायबर पोलिस ठाण्यावर येत आहे. या पोलिस ठाण्यात कुशल मनुष्यबळाची गरज आहे. तक्रार अर्जांची संख्या लक्षात घेता प्रत्येक गुन्ह्याचा तपास करणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्वतीत सायबर पोलिस ठाणे उभारून प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहोत.
मिसाळ पुढे म्हणाल्या, पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढणारी पुणे शहराची हद्द लक्षात घेता आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, काळे, फुरसुंगी, काळेपडळ या ठिकाणी पोलिस स्टेशन उभारण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलिस ठाण्यांवरील ताण कमी होऊ शकेल. पर्वती मतदारसंघात सिंहगड रस्ता आणि बिबवेवाडी परिसरात प्रत्येकी एक पोलिस स्टेशन व पोलिस चौकी उभारण्यात आली. या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देता आले. तसेच प्रशासनात गतिमानता यावी यासाठी संगणक उपलब्ध करून दिले. गुन्ह्यांचा तपास तत्काळ आणि कुशलतेने होण्यासाठी पोलिस ठाण्यांच्या तपास पथकांना बूस्ट मिळाला. त्यामुळे मतदारसंघातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.