पुणे , प्रतिनिधी –
भाजपने सर्वांना सन्मान देण्याचे काम केले आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी उज्वला योजना, लखपती दीदी योजना, अवास योजना सुरू करण्यात आली. आस्था केंद्र विकसित करण्यात आले त्यातून धार्मिक पर्यटन वाढले आहे. देशातील पायाभूत सुविधा मजबुतीकरण करण्याचे काम एक विचाराचे केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. सुरक्षा, सन्मानसाठी महायुतीला मतदारांनी मत द्यावे असे मत भाजप खासदार आणि पुण्याचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, प्रशांत कोतवाल उपस्थित होते.
सत्यपाल सिंग म्हणाले,‘ सबका साथ, सबका विकास ‘ नुसार आम्ही निवडणुकीस समोरे जात आहे. मागील दहा वर्ष केंद्र मध्ये आमचे सरकार काम करून समाजातील सर्वांना न्याय देणे काम करत आहे. कोणाचे तुष्टीकरण आम्ही करत नाही. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना सुरक्षा महत्वाची आहे ते देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. पोलीस खात्यात मी ३५ वर्ष काम केले त्यावेळी कोणाला खात्री नव्हती की कुठे बॉम्ब स्फोट होईल. पण मागील दहा वर्षात हे प्रमाण खूप कमी झाले. नक्षलवाद देखील संपुष्टात आणला गेला आहे. पाकिस्तान सीमेवर पूर्वी अनेक जवान शहीद होत आता ते प्रमाण कमी झाले. धार्मिक दंगली पूर्वी घडत होत्या पण आता दिसत नाही. महाराष्ट्र मध्ये महायुती सरकारने जलद गतीने विकास पोलीस दलात साधण्यात काम केले. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर सुरक्षा प्रदान केली आहे तसेच अत्याधुनिक तपास यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्र मध्ये झालेली आहे कारण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे. पण तरी देशात काही लोक जाती, धर्म नावावर राजकारण करून भेदाभेद करत आहे. नागरिकांना मागील दहा वर्षात कोणी अन्न, वस्त्र , निवारा यापासून वंचित राहिले नाही. ८० कोटी जनतेस अन्नधान्य वाटप करण्यात आले. काँग्रेसने गरीबी हटाव नारा दिला पण गरीबी ते दूर करू शकले नाही. लाडकी बहिण योजना, शेतकरी सन्मान योजना , विश्वकर्मा माध्यमातून महिला, शेतकरी आणि कामगार यांना सक्षम करण्यात आले आहे. देशात स्वातंत्र्य नंतर अनेक पोलीस, जवान शहीद झाले पण त्यांच्यासाठी प्रथम स्मारक मोदी सरकारने निर्माण केले आहे.
पुढे ते म्हणाले, ड्रग आणि सायबर क्राईम आज जागतिक समस्या आहे. समाज समोर येऊन पोलिसांच्या सोबत एकत्रित काम करत नाही तोपर्यंत ही समस्या मुळापासून नष्ट होणार नाही. मुंबईतील नेते बाबा सिद्दिकी यांचा झालेला खून दुर्देवी आहे याप्रकरणात आतापर्यंत २१ आरोपी अटक करण्यात आले आहे. या खूनामागे अनेक कारणे आहे. पण याप्रकारने कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असे म्हणता येणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मो कोणत्याही दबावाला बळी पडून कधी काम केले नाही.