पुणे, प्रतिनिधी -एखाद्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही तर अनेकजण टीका करतात. त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त, मस्त अशा प्रकारचे कार्यकर्ते असतात. लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा मते अल्पसंख्याक समाजाची विरोधकांना पडल्याने अनेक भाजप उमेदवार जाणीवपूर्वक ठरवून पाडले गेले. पक्ष हा नेत्यांमुळे नसतो तर कार्यकर्त्यांमुळे असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मतदारांमधील उदासीनता कमी करून पक्षाचे मतदान वाढविण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. संघटित लोकांमध्ये खोटी कथ्य पसरवणे हा युद्धशास्त्राचा जुना खेळ आहे, हे 2024 मधील लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘उत्सव लोकशाहीचा – प्रत्येक मत महत्त्वाचे ‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय तडके, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शहाजी खरात, डॉ. प्रीती आफळे उपस्थित होते. निरगुडकर म्हणाले, लोकशाही असलेल्या भारतात उत्सवप्रेमी लोक आहेत. आपला डीएनएच उत्सवाचा आहे. निवडणुक ही एकमेव उत्सवाची जागा नसली तरी आपल्या देशाचे भवितव्य बदलण्याची क्षमता त्यात आहे. निवडणुकीत पडलेले मतदानाचे आकडे हे केवळ आकडे नसतात तर समाजमनाचे विश्लेषण असते. परंतु ते कशाप्रकारे वाचावे, हे अनेकजणांना समजत नाही.
लोकशाही निवडणुकीत केवळ भाजपचे अंदाज चुकले नाहीत तर माध्यमांचे, राजकीय तज्ञांचे आणि विरोधक यांचे अंदाजही चुकले होते. निकाल कसा लागणार याच्या आकडेवारीत फरक पडला. भाजपला सन २०१४ च्या निवडणुकीत २८२ जागा येऊन ३१% मते मिळाली होती तरीही भाजप त्यावेळी जिंकला. कारण लोकांनी ठरवून काँग्रेसला हरवले त्यामुळे भाजपचा मतटक्का वाढला. सन २०१९ मध्ये भाजपला ३८% मतदान झाले. हे मतदान वाढले कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणण्याचे लोकांनी ठरवले. ७% मते वाढल्यावर पक्षाला २६ जागा अधिक मिळाल्या. सन २०२४ मध्ये भाजपला मागील निवडणूक पेक्षा १.३७% कमी मतदान झाले. पण त्यामुळे ६६ जागांचे नुकसान झाले. मिळालेली मते आणि जागा याचे विचित्र गणित पहिल्यांदाच पाहावयास मिळाले कारण एका पक्षाला हरविण्यासाठी ठरवून झालेले हे मतदान होते. त्यामुळे भाजपला फटका बसला. पण सलग दुसऱ्यांदा ३७% मते मिळणे, हे लोकप्रियतेचे लक्षण आहे. परंतु जाणीवपूर्वक भाजप कोसळला असे विरोधकांकडून भासविण्यात आले. सर्वात मोठे युद्ध मनावर आघात करणारे असते. खोट्या बातम्या दाखवून ते बिंबवले जाते. त्याच्याच परिणामी असंतोष माजतो.
प्राचार्य डॉ. तडके म्हणाले, प्रत्येकाने निवडणुकीत आपला मतदान हक्क बजावावा, यासाठी नेहमी आग्रह केला जातो. पण आपण काहीसे त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला लोकशाहीत मतदान हक्क मिळाला असून त्याचा वापर आपण जबाबदार नागरिक म्हणून केला पाहिजे. विद्यार्थिनी सारथी वेदपाठक हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.