पुणे, प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली असून विविध गाेष्टींचे सूक्ष्म नियाेजन करण्यात येत आहे. राज्यातील विविध विभागात भाजपकडून मध्यवर्ती मिडिया सेंटरची उभारणी करण्यात येत असून पश्चिम महाराष्ट्रासाठी पुण्यातील बाजीराव रस्ता येथील भारत भवन याठिकाणी विस्तारित अशा मध्यवर्ती मिडिया सेंटरचे उदघाटन परराष्ट्रमंत्री जय शंकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या उपस्थिीतीत शनिवारी करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, राष्ट्रीय माध्यम प्रमुख के.के.उपाध्याय, शहराध्यक्ष धीरज घाटे, संदीप खर्डेकर, अमाेल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित हाेते. यावेळी केशव उपाध्ये म्हणाले, संबंधित मिडिया सेंटर हे पत्रकारांसाठी पत्रकारांनी निर्माण केलेले केंद्र आहे.
पत्रकारांची निवडणुक काळात खूप धावपळ हाेत असते. वेगवेगळे काेट घेणे, मुलाखती घेणे, प्रेसनाेट करणे , विविध कार्यक्रम उपस्थित राहणे यामुळे पत्रकारांना एकाच ठिकाणी नेत्यांच्या प्रतीक्रिया घेणे, पत्रकार परिषदा, मुलाखत, स्टुडिओ उपलब्धता, वन टु वन, अनाैपचारिक गप्पा या सर्व गाेष्ट एकाच ठिकाणी ही यामागील कल्पना आहे. निवडणुक हाेईपर्यंत सर्व पत्रकार परिषद व मुलाखती मिडिया सेंटर मध्ये हाेईल. माध्यम केंद्रात पत्रकारांचे साेईसाठी वायफाय, लाईव्ह फुटेज, संगणक उपलब्धता याठिकाणी करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी हे मिडिया सेंटर असून त्याचा वापर त्यांनी करावा. राज्यातील प्रत्येक विभागात अशाप्रकारे मिडिया सेंटर निर्माण करण्यात येत आहे. पत्रकारांचे अनाैपचारिक गप्पांचे ठिकाण येथे आगामी काळात सुरु राहील.