पुणे : महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करावी अशी सुचना पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिकेतील पदाधिकार्यांच्या बैठकीत केली. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी गणेश बिडकर उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुणे शहरात सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी, व्यावसायिक, व्यापारी अशा सर्व स्तरावरील नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यानंतरच्या दोन महिन्यानंतर सुद्धा आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत नाही. त्याचा थेट परिणाम पुणे महानगरपालिकेच्या महसुली उत्पन्नावर झाला आहे.’
मुळीक पुढे म्हणाले, ‘महापालिकेच्या महसुली उत्पन्नात ४७०० कोटी रुपयांची मिळकतकर थकबाकी आहे. त्यामध्ये २१०० कोटी रुपये मुद्दल आणि २५०० कोटी रुपये दंडाची रक्कम आहे. दंडाच्या रकमेत अधिकाधिक सवलत दिल्यास थकबाकीदार करदात्यांना दिलासा मिळू शकेल. त्यामुळे थकबाकी वसुली होऊ शकेल. पर्यायाने महसुली उत्पन्नात वाढ होऊन विकासकामांना गती देता येईल.

