
पिंपरी चिंचवड : (राजश्री आतकरे पवार) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संघटनात्मक हालचालींना गती मिळाली आहे. पक्षश्रेष्ठींनी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्यावर विश्वास दाखवत पुणे उत्तर जिल्ह्याच्या ‘निवडणूक प्रमुख’पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.
भाजपच्या अंतर्गत संघटनात ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून, लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे निवडणूक नियोजन अधिक काटेकोर आणि प्रभावीपणे पार पडणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
महेश लांडगे हे पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या थेट संपर्कासाठी ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि पक्षाचे तळागाळातील नेटवर्क अधिक मजबूत होते, असे मत भाजपच्या वरिष्ठांकडून व्यक्त केले जात आहे.
या नव्या जबाबदारीमुळे पुणे उत्तर विभागातील भाजपची निवडणूक रणनीती अधिक धारदार होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलण्याची तयारी आता सुरु झाली असून, लवकरच कार्यकर्त्यांच्या बैठकींना आणि बूथस्तरावरच्या मोहिमांना गती मिळणार आहे.
