कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरात दिव्यांची रोषणाई; आरोग्य आणि धनसमृद्धीसाठी महासंघाचा पुढाकार.

पिंपरी-चिंचवड: ( राजश्री आतकरे पवार )अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी-चिंचवडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला.
कार्यक्षम नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महासंघाचे मार्गदर्शक महेशजी कुलकर्णी, तसेच प्रदेश उपाध्यक्ष पुष्कराजजी गोवर्धन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी, ब-प्रभाग अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची प्रास्तावना केली. नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना, घरातून दारिद्र्य दूर होऊन आरोग्य व धनसंपदा लाभावी, अशी सदिच्छा व्यक्त केली.
महेश कुलकर्णी यांनी त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, याच दिवशी भगवान महादेवांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. म्हणून महिला भगिनी महादेवाच्या मंदिरात त्रिपुरी वात लावून अंधाराचा नाश करण्याची प्रार्थना करतात. “अंधाराचा नाश होऊ दे आणि दिव्याने दीवा लावून ही सृष्टी उजळून जाऊ दे,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, ब्रह्म उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष राजनजी बुडूख, प्रदेश सरचिटणीस दिलीपजी कुलकर्णी, प्रदेश चिटणीस संजयजी परळीकर, तसेच पवन वैद्य, सुषमा वैद्य, महेश बारसावडे, आनंद देशमुख, शामकांत कुलकर्णी, संध्याताई कुलकर्णी यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामकांत कुलकर्णी यांनी केले, तर आनंद देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
