
पिंपरी : राजश्री पवार
जुनी सांगवी परिसरातील नागरिकांची आधार कार्ड संबंधित कामांसाठी होणारी धावपळ आता थांबणार आहे! सांगवी गावठाण येथील तलाठी कार्यालयात नवीन आधार केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले असून, यामुळे स्थानिक नागरिकांना आधार कार्ड नोंदणी, माहिती अद्ययावत करणे (अपडेट) आणि बायोमेट्रिक सेवा आता जवळच उपलब्ध होणार आहेत. ‘सांगवी विकास मंच’च्या विशेष प्रयत्नांमुळे ही महत्त्वपूर्ण सेवा नागरिकांसाठी सुरू झाली आहे.
डिजिटल ओळखीसाठी सुलभता


या केंद्राच्या माध्यमातून सांगवी परिसरातील नागरिकांना डिजिटल ओळखीच्या सेवांमध्ये सुलभता येणार आहे. ‘सांगवी विकास मंच’चे कार्याध्यक्ष ओंकार भागवत यांनी सांगितले की, “सांगवी परिसरात यापूर्वी एकही आधार केंद्र कार्यरत नसल्यामुळे नागरिकांना मोठे कष्ट घ्यावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन महा ई-सेवा केंद्राला नवीन आधार केंद्र मंजूर झाल्याने आता सर्व आधारसंबंधित सेवा सांगवीतच उपलब्ध होतील.” या केंद्राद्वारे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख यांसारख्या माहितीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया आता अत्यंत सोपी आणि जलद होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याला माजी महापौर माई ढोरे, जवाहर ढोरे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, शिवराज शितोळे, ह.भ.प. बब्रुवान महाराज वाघ यांसह सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत, प्रमोद ठाकर, दिलीप तनपुरे, उज्ज्वला ढोरे, गणेश ढोरे, धम्मरत्न गायकवाड, विश्वनाथ शिंदे, चेतन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली.
या कार्यक्रमाचे आयोजन ‘सांगवी विकास मंच’चे कार्याध्यक्ष ओंकार भागवत यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी नारायण भागवत यांनी यशस्वीपणे पार पाडली.