• 3 हजार ढोल, 1 हजार ताशा अन्‌ 500 हून अधिक भगवा ध्वज
  • हिंदूभषण स्मारक ट्रस्टच्या पुढाकाराने राज्यातील लक्षवेधी सोहळा

पिंपरी-चिंचवड : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे भव्य-दिव्य आणि सर्वांत उंच पूर्णाकृती शिल्प अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे. भगवा ध्वज हा शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतिक असून, या ध्वजाला आणि भगव्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शंभुराजांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वांत मोठा ढोल-ताशा ऐतिहासिक अन्‌ गगनभेदी निनाद सोहळा आयोजित केला आहे.

बोऱ्हाडेवाडी-मोशी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या मान्यतेने छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती शिल्प आणि शंभुसृष्टी उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार तथा हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे अतिभव्य स्मारक उभारले जात आहे.

महाराष्ट्रामध्ये ढोल-ताशा या पारंपरिक वादन सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषित केलेल्या गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या ढोल-ताशा महासंघाच्या वतीने जगातील सर्वांत उंच शिल्प ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ ला मानवंदना देण्याचा संकल्प मांडला होता. त्यानुसार, रविवार, दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे ऐतिहासिक मानवंदना सोहळा होणार आहे. तसेच, येत्या दि. 2 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती शिल्पाच्या तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भुजबळ यांनी दिली.


शिव-शंभुप्रेमींना आवाहन…
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय ऐतिहासिक कार्याला ढोल-ताशांची ही मानवंदना अर्पण केली जाणार आहे. त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या आणि धर्मरक्षणाच्या संघर्षमय कार्याचा जागर या माध्यमातून घडणार आहे. शिव-शंभूंचा विचार संपूर्ण जगभर पोहोचवण्याचा संकल्प हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने केला आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील शिव-शंभूप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण, तब्बल 3 हजार ढोल, 1 हजार ताशा आणि 500 भगवे ध्वज यांसह ऐतिहासिक आणि गगनभेदी मानवंदना होणार आहे. मराठ्यांच्या इतिहासावर आधारित रोमांचक गीतांची झलकही पहायला मिळणार आहे. ‘शिवराय आणि शंभूराजांच्या विचारांचे मावळे’ म्हणून या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ढोल-ताशा महासंघ आणि हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने केले आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »