
पिंपरी : “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यमांवर आज बंधनांची छाया आहे. गोदी मीडिया म्हणून टीका होत असतानाही निडरपणे सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची भूमिका दीपस्तंभासारखी आहे,” असे मत उद्धव ठाकरे गटाचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयनगर, काळेवाडी येथील कारवार कोकण समाज सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार सातुर्डेकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये सविता जाधव, शोभा धावटे, डॉ. अलवी सय्यद, डॉ. राजेंद्र किरके, रितू पसरीचा, विजयश्री काजळे, डॉ. संजय मांडलिक, डॉ. पियुषा कडूस, गीता जोशी, रणदिवे सर, रवींद्र फडतरे, डॉ. अभिजीत शेखर, संजय गायखे, प्रकाश तांबोरे, डॉ. प्रकाश जाधव, डॉ. भूषण ढालपे, अनिकेत वढणे, वैष्णव जाधव, राज नखाते, जया चासकर यांचा समावेश होता.


तसेच युवा खेळाडू अनुष्का येळवे, सृष्टी पवार, श्रेया अलर, सार्थक आहेर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
सत्कार स्वीकारताना सातुर्डेकर म्हणाले, “आपले कार्य हे केवळ पुरस्कारासाठी नसते, पण जेव्हा कुणीतरी पाठ थोपटतो तेव्हा केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते न थांबता सामान्यज्ञान, परदेशी भाषा, इंग्रजी, हिंदी अशा गोष्टींचे ज्ञान मिळवून AI सारख्या नवतंत्रज्ञानाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज व्हायला हवे.”
संयोजक मंडळींमध्ये शिवसेना विधानसभा प्रमुख हरेश नखाते, काळेवाडी विभाग संघटिका सुजाता नखाते, महिला शहर संघटिका रूपाली आल्हाट, जिल्हा समन्वयक सुशीला पवार, वैभवी घोडके, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, गोरख पाटील, संवाद व्यासपीठाचे हरीश मोरे, ह्यूमन राइट्स संघटनेच्या अनिता वर्मा यांचा समावेश होता.
प्रास्ताविक : सुजाता नखाते
सूत्रसंचालन : गोरख पाटील
आभारप्रदर्शन : हरेश नखाते