
पुणे : औंधमधील ब्रेमेन चौक परिसरात उघड्या आणि असुरक्षित वीज यंत्रणेने दोन तरुणांचे प्राण घेतले. डीपीच्या (डिस्ट्रिब्युशन बॉक्स) संपर्कात आल्याने त्यांना जोरदार विजेचा शॉक बसला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेत विनोद चिंतामण क्षीरसागर (२९, रिक्षाचालक, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) आणि सौरभ विजय निकाळजे (२७, नोकरदार, रा. कोथरूड) यांचे निधन झाले. १३ जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत विनोद घरी न परतल्याने त्यांच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती. शोध घेता दोघेही ब्रेमेन चौकाजवळील सार्वजनिक शौचालयाजवळ एमएसईबीच्या डीपीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. एमएसईबी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वीजपुरवठा बंद करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेनंतर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.


या प्रकरणामुळे शहरातील उघड्या आणि दुर्लक्षित वीज यंत्रणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून सार्वजनिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.