‘मालिका ‘कॉन्स्टेबल मंजू’ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेने केवळ महिलांचं किंवा तरुणांचंच नव्हे, तर वयोवृद्ध प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. त्याचंच एक जिवंत उदाहरण नुकतंच मालिकेच्या सेटवर पाहायला मिळालं. सध्या मालिकेत सत्या निवडणुकीत विजयी झाला असून, विजयानंतरच्या मिरवणुकीत मंजूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते. हा एपिसोड पाहून अनेक प्रेक्षक भावूक झाले. मंजूला गोळी लागल्याच्या प्रसंगाने ८४ वर्षांचे दत्तू कर्णे यांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली की, त्यांनी घरात कोणालाही न सांगता सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी गावातून थेट साताऱ्यात पोहोचले.
आजोबांनी सातारा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं – “मंजू कशी आहे? ती बरी आहे ना?” त्यांच्या चेहऱ्यावरून मंजूबद्दल काळजी, प्रेम, आपुलकी, आणि तीव्र भावना स्पष्ट जाणवत होत्या. साताऱ्यातील पोलीस उप निरीक्षक अशोक सावंजी, कॉन्स्टेबल अनिल सावंत यांनी या आजोबांच्या भावना समजून घेत, त्यांना ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या सेटवर नेण्याची विशेष व्यवस्था केली. सेटवर पोहोचताच आजोबांनी अभिनेत्री ‘मंजू’ म्हणजेच मोनिका राठीचा हात पकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सत्याला आईच्या चुकीसाठी थेट सुनावलं आणि इतर कलाकारांनाही खरीखुरी पात्रं समजून स्पष्ट शब्दांत आपली मतं मांडली. हा क्षण इतका भावूक होता की, संपूर्ण युनिटच्या डोळ्यांत पाणी आलं.
याचदरम्यान, आजोबा घरच्यांना न सांगता निघून गेल्यामुळे त्याचं कुटुंब काळजीत होतं. आजोबा साताऱ्या पोलीस स्टेशन मध्ये पोहोचताच पोलिसांनी दत्तू कर्णे यांच्या कुटुंबाला ते साताऱ्या मध्ये असल्याचं कळवल. मात्र, मालिकेच्या टीमने त्या गोष्टीची तत्काळ दखल घेतली, आजोबांशी प्रेमपूर्वक संवाद साधला आणि त्यांना आदरातिथ्यासह सुखरूप घरी परत पाठवण्याची व्यवस्था केली. या भावस्पर्शी घटनेबाबत अभिनेत्री मोनिका राठी म्हणाली की, “मंजू या पात्राला मिळणारं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही. मला गोळी लागली म्हणून ८४ वर्षांचे आजोबा थेट सेटवर आले, हे आमच्यासाठी धक्कादायक आणि अतिशय भावूक होतं. सोशल मीडियावर प्रेक्षक नेहमी प्रतिक्रिया देतात, पण प्रत्यक्ष कोणीतरी, तेही एवढ्या वयात, एवढा मोठा प्रवास करून, केवळ मालिकेतील पात्राची काळजी घेऊन पोहोचतो ही फारच मोठी गोष्ट आहे. त्यांनी माझा हात धरून माझ्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या डोळ्यांतली काळजी पाहून आम्ही सारे भारावून गेलो. हेच खरं यश आणि कलाकार म्हणून सर्वात मोठं समाधान आहे. ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका आज फक्त एक कथा न राहता, मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयाशी नाळ जोडली आहे. मालिकेतील पात्र, प्रसंग, आणि भावना इतक्या जिवंतपणे पोहोचत आहेत की, प्रेक्षक त्यात गुंतून जात आहेत, त्यात जगू लागले आहेत. प्रेक्षकांचं हे निखळ प्रेम पाहता ‘सन मराठी’ व ‘कॉन्स्टेबल मंजू’च्या संपूर्ण टीमसाठी खऱ्या अर्थाने सर्वात मोठा पुरस्कार आहे.”

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »