नागरिकांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही

हिंजवडी : हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन सह्यांच्या मोहिमेला आता राजकीय पाठबळ मिळाले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी या मोहिमेला ठाम शब्दांत पाठिंबा जाहीर केला असून, “या प्रश्नावर मी हिंजवडीतील नागरिकांच्या सोबत आहे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

हिंजवडी आयटी पार्क परिसरात सध्या नागरिक व आयटीयन्स रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या नागरी सुविधा यामुळे त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्यांवर कायमस्वरूपी उपाय व्हावा, यासाठी वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याण संस्थेचे (WPRDWA) अध्यक्ष सचिन लोंढे यांच्या पुढाकाराने #UNCLOGHinjawadiITPark या मोहिमेंतर्गत ऑनलाईन सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमार्फत हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश व्हावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी म्हटले की, “हिंजवडीतील नागरिक आणि आयटीयन्स प्रश्न मी समजून घेतले आहेत. या भागातील नागरी सुविधांची अवस्था अत्यंत वाईट असून, त्यावर पालिकेच्या माध्यमातूनच प्रभावी उपाय होऊ शकतात. म्हणूनच मी या मागणीचे पूर्ण समर्थन करतो आणि यासंदर्भात प्रशासनाकडेही पाठपुरावा करणार आहे.”

ऑनलाईन सह्यांची ही मोहीम नागरिकांच्या सहभागामुळे दिवसेंदिवस बळकट होत आहे. यामध्ये सहभागी झालेले नागरिक सांगतात की, हिंजवडीसारखा आयटी हब महानगरपालिका क्षेत्रात आला तर रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होतील. यामुळे लाखो आयटीयन्सना दिलासा मिळेल, तसेच आयटी उद्योगांच्या विकासालाही चालना मिळेल.

या मागणीला आता आमदार शंकर जगताप यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे या आंदोलनाला नवे राजकीय वजन प्राप्त झाले आहे. लवकरच या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास विभागाकडे अधिकृत निवेदन देण्यात येणार असून, नागरिक प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करत आहेत.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »