पिंपरी-चिंचवड मनपा क्षेत्रात तुर्की आणि चीनच्या उत्पादनांवर बंदी घालण्याची भाजपची मागणी; शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे आयुक्तांना पत्र.

पिंपरी-चिंचवड : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानला अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष मदत करणाऱ्या तुर्की, अझरबैजान आणि चीन या देशांच्या उत्पादनांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात एक लेखी पत्र दिले आहे. महापालिकेच्या विविध विकासकामांमध्ये आणि इतर सरकारी कामांमध्ये या देशांच्या उत्पादनांचा वापर तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी काटे यांनी पत्राद्वारे केली आहे.

शत्रुघ्न काटे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की, अझरबैजान आणि चीन या देशांच्या उत्पादनांवर बंदी घालण्याचे सरकार आणि समाजातील विविध घटकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निर्देश आहेत. या तीव्र भावना लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व सरकारी कामांमध्ये, विशेषतः महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांमध्ये आणि इतर कामांमध्ये तुर्की, अझरबैजान आणि चीनमधील कंपन्यांची उत्पादने वापरली जाऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास गंभीर परिणामांचा इशाराही काटे दिला आहे.

“या देशांतील कंपन्यांच्या उत्पादनांचा वापर महापालिकेकडून केला जात असल्यास त्याची गंभीर दखल घेण्यात येईल आणि त्याविषयी आंदोलन व अन्य मार्गाने अशी कामे न होण्याबाबत आम्ही योग्य ती भूमिका घेऊ,” असे काटे यांनी पत्रात म्हटले आहे.

त्याचबरोबर, आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व विभागांना या संदर्भात तातडीने सूचना द्याव्यात आणि विकास प्रकल्पांमध्ये व अन्य कामांमध्ये या देशांतील उत्पादने वापरली जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल, याची खात्री करावी, अशी विनंतीही काटे यांनी केली आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »