तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा ईशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे जसे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, तसे ते माजी मंत्री छगन भुजबळ यांचेही नेते आहेत. असे असताना भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते अजित दादांच्या फोटोला जोडे मारण्याचे आंदोलन करतात. अशा कार्यकर्त्यांना भुजबळ साहेबांनी समजावून सांगावे. आम्ही अजित दादांचा अवमान सहन करणार नाही. पुन्हा असे आंदोलन केले तर आम्ही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. अजित दादांनी भुजबळ साहेबांना खूप काही दिले आहे, त्यांच्या मुलाला काही महिन्यापूर्वीच विधान परिषदेवर संधी दिली आहे. सगळी पदे त्यांच्याच घरात दिली तर इतरांनी काय कारायचे, असाही सवाल मानकर यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्याने पुण्यातील समता परिषदेच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. याप्रकरणाचा निषेध म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या प्रसंगी दीपक मानकर म्हणाले, ज्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जोडे मारो आंदोलनाला श्री. छगन भुजबळ यांचा छुपा पाठींबा दिलेला आहे का ? कारण त्यांनी येवला येथे सांगितले की जोडे मारो आंदोलन करू नका. राजकीय जीवनात आपल्या वयाची मर्यादा देखील लक्ष्यात घेतली पाहिजे, एका बाजूला श्री. भुजबळ साहेब म्हणतात पवार साहेबांचेही देखील वय झाले आहे. या गोष्टीचा विचार श्री. भुजबळ साहेबांनी केला पाहिजे. भुजबळ साहेबांचे देखील वय झाले आहे आता त्यांनी थांबायला पाहिजे. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी छगन भुजबळ साहेबांना कुठेही नाकारले नाही. चर्चेच्या माध्यमातून त्यांना कुठे संधी द्यायची , तसेच प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे साहेबांनी पण सांगितले कश्या पद्धतीने यातून मार्ग काढता येईल.या गोष्टीचा विचार करू. एवढ असूनसुद्धा ते जर असे म्हणत असतील तर ज्या ज्या वेळी संधी आली त्या त्या वेळी उपमुख्यमंत्री श्री. अजितदादांनी महत्त्वाचे पदे श्री. छगन भुजबळ साहेबांना देत संधी दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी आठवण भुजबळ साहेब विसरले आहेत का ? काही दिवसांपूर्वी श्री. पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर अजितदादांनी संधी दिलेली आहे आणि भुजबळ साहेब ओबीसीचे नेते म्हणून मिरवत असतील तर या महाराष्ट्रात ओबीसीचे नेते खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. ज्यांचे काम पण चांगले आहे आणि त्यांचे कर्तृत्व पण सिद्ध झाल आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी मी ओबीसीचा नेता म्हणून कोण मिरवत असेल तर याचा मी निषेध करतो. कारण की श्री. अजितदादांनी या मंत्रिमंडळात चार ओबीसी आमदारांना मंत्री पदाची संधी दिलेली आहे. म्हणजे चार ओबीसी नेते मंत्री झालेलं आहेत. संपूर्ण महायुती सरकारमध्ये १५ ते १७ ओबीसी आमदार आहेत. यापेक्षा आणखी वेगळ काय घडायला पाहिजे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला त्या कार्यकर्त्यांना सांगायचे आहे. इथून पुढे अशी चूक करू नका. श्री. छगन भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असाल तर आमचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचा जर असा अवमान करीत असाल तर त्याच त्या पद्धतीने उत्तर देण्याची क्षमता पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निश्चितपणे आहे. अस चालवून घेणार नाही. ४०-४० वर्षे आम्हीसुधा रस्त्यावर येऊन चळवळीमध्ये काम करत आलो आहोत. आम्हांला माहिती आहे आंदोलन कसे करायचे ते. श्री. छगन भुजबळ साहेबांना विंनती राहील की तुमच्या कार्यकर्त्यांनापण समज द्या कारण आंदोलन करणारे समता परिषदेचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाहीत. या पद्धतीने जर तुम्ही अजितदादांचा अवमान करीत असला तर हे आम्ही कदापी सहन करणार नाही. अजितदादांनी व प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब हे छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत लवकरच लवकर चांगला निर्णय घेतील कारण एवढ्या ज्येष्ठ नेत्याबाबत त्यांनी देखील मंत्रिमंडळात सातत्याने बरोबर ठेवण्याचे काम श्री.अजितदादांनी केलेलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ साहेबांनीदेखील समन्वयकाची भूमिका घ्यायला पाहिजे.