भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
रस्त्यांच्या विकासाकामांमुळे नागरिकांची वाहतूककोंडीतून होणार मुक्तता
हिंजवडी आयटी पार्कसोबत पिंपरी-चिंचवडची कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार
चिंचवड, दि. २ ऑक्टोबर – पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यानुसार वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागातील सुमारे ३४ किलोमीटर लांबीचे रस्ते करण्यात येणार असून या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे पीएमआरडी हद्दीतील मावळचा ग्रामीण भाग आणि हिंजवडी आयटी पार्कसोबत पिंपरी-चिंचवडची कनेक्टिव्हीटी आणखी वाढणार आहे. तसेच नागरिकांना दळणवळणासाठी कायमस्वरुपी चांगले रस्ते उपलब्ध होणार आहेत.
शंकर जगताप यांनी चिंचवड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे अधिक विस्तृतपणे निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यासाठी त्यांनी चिंचवड मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्याचप्रमाणे त्या भागात जाऊन पाहणीही केली. रस्ते नसल्यामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. या भागात अनेक गृहप्रकल्प उभे आहेत. तसेच अनेक गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांनी या भागात शाळा-महाविद्यालये सुरू केली आहेत. जवळच हिंजवडी आयटी पार्क आहे. त्याचप्रमाणे मुंबईला जाण्यासाठी द्रुतगती महामार्गही उपलब्ध आहे. त्यामुळे या भागात वास्तव्याला येणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. परिणामी विकास आराखड्यातील रस्ते झालेले नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व बाबी पाहिल्यानंतर शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकसित व्हावेत यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देत यासंदर्भात प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या पाठपुराव्यामुळे “ब” आणि “ड” प्रभागातील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागातील सुमारे ३४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
त्यामध्ये मुंबई-बंगळुरू महामार्गाला लागून असलेल्या सर्व्हिस रस्त्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे मामुर्डी स्मशानभूमीजवळ पवना नदीवर सांगवडे व हिंजवडीला जोडणारा पूल, रावेत व किवळे भागात समीर लॉन्समागील नदीजवळील १८ मीटरचा रस्ता, विकासनगरमधील मुख्य रस्ता, पुनावळे अंडरपास ते काटेवस्ती ३० मीटरचा रस्ता, कोयतेवस्ती चौक ते जांभेकडे जाणारा १८ मीटरचा रस्ता, वाकड मधूबन हॉटेल ते इंदिरा रोड ते सिल्व्हर स्कूल हॉटेल २४ व १८ मीटरचा रस्ता तसेच त्या त्या भागातील विकास आराखड्यातील इतर रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे या भागात रस्ते विकासकामांचा लवकरच धडाका सुरू होणार आहे. हे रस्ते करताना ते वारंवार खोदावे लागणार नाहीत अशा पद्धतीने केले जाणार आहेत. पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, ड्रेनेजलाईन, विद्यतलाईन टाकूनच हे रस्ते कायमस्वरूपी विकसित केले जाणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना शंकर जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात असलेली चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक रस्ते मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आधी हे रस्ते कोणते याची माहिती गोळा करून ते पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर प्रशासनाने त्यावर कार्यवाही करून पहिल्या टप्प्यात वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि विकासनगर या भागातील रस्त्यांच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. हे सर्व रस्ते सुमारे ३४ किलोमीटर लांबीचे आहेत. हे रस्ते उपलब्ध नसल्याने तेथील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता हे रस्ते मार्गी लागतील. त्यामुळे तेथील नागरिकांना दळणवळणाची चांगली सुविधा लवकरच उपलब्ध होईल. त्याप्रमाणे या रस्त्यांमुळे पीएमआरडीएच्या हद्दीतील मावळचा ग्रामीण भाग आणि हिंजवडी आयटी पार्कसोबत पिंपरी-चिंचवडची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यांमुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होईल. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना महापालिका आयुक्तांना केल्याचे त्यांनी सांगितले.”