पुणे : संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी शास्त्रीय संगीतात स्वतःची शैली निर्माण केली. शिष्यांच्या दोन- तीन पिढ्या त्यांनी घडविल्या. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये दरवर्षी ते गात असत. आमच्या कुटुंबाशी देखील त्यांचे प्रेमाचे संबंध होते. 1998-99 च्या सुमारास असचं महोत्सवात त्यांचं गाणं होतं. माझी आई वत्सलाबाई जोशी या त्यावेळी आजारी असल्याने येऊ शकल्या नव्हत्या, तर दुस-या दिवशी सकाळीच पंडितजी आमच्या घरी आले, त्यांनी हार्मोनियम मागवून घेतली न आईसमोर गायला बसले. मनस्वी आणि प्रेमळ स्वभावाच्या पं. जसराजांचे माझे वडिल भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याशी देखील प्रेमळ नाते होते. ‘बिरबल माय ब्रदर’ या चित्रपटात त्या दोघांनी जोडीने पार्श्वगायन देखील केले होते. पं जसराज यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
श्रीनिवास जोशी, आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष