राज्यातील ६५ हून अधिक संस्था, संघटना एकत्र
पुणे : नाटक, चित्रपट, शाहीरी, लोककला आदी विविध कला क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करणार्या लाखो कलाकारांच्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत, या कलाकारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील कला क्षेत्रातील ६५ हून अधिक संस्था एकत्र आल्या आहेत. गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत ‘महा कला मंडल या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आली.
महा कला मंडलाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत खाबिया यांची निवड करण्यात आली. याविषयी मेघराज राजेभोसले म्हणाले, महाराष्ट्रातील कलाकारांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली आहे. यानिमित्ताने ६७ संघटना एकत्र येऊन कलाकारांच्या हितासाठी काम करणार आहेत. माझी अध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. कलाकारांचे प्रश्न याद्वारे सोडविले जातील.


पुढील काळात या माध्यमातून आम्ही मराठी कलाकारांच्या प्रश्नांसाठी आणि हितासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहोत. आतपर्यंत मराठी कलाकारांची कुठेही नोंदणी करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करणार आहोत. सरकारने कलाकारांसाठी महामंडळ स्थापन करावे, कलाकारांचे आरोग्यनविम्याचा प्रश्न सोडवावा, प्रवास खर्चात सूट द्यावी आणि त्यांच्यासाठी घरकुल योजना राबवावी असे मुद्दे मांडणार आहोत.
लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, कला संघटना एकत्र आल्यामुळे आता कलाकारांचे प्रश्न लवकरच सुटतील. राज्यातील कलाकारांची नोंदणी, आरोग्यविमाचा लाभ, नोकर्यांमध्ये संधी, ऑनलाईन कार्यक्रमावर होणार्या कायद्याच्या अडचणी सोडविणे, कलाकारांचे वादविवाद सोडविणे, स्थानिक कलाकारांना काम मिळणे, राज्यपातळीवर एकच मानधन असावे, कलावंतच्या मुलांसाठी शिक्षण सुविधा, प्रत्येक जिल्ह्यात कलाभवन असावे आदी विविध प्रश्न मांडणार आहोत.