पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘रौंदळ’ हा चित्रपट अखेर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ३ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘रौंदळ’ हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत राहिला आहे. यातील सर्वात मोठं कारण म्हणजे या चित्रपटातील भाऊसाहेब शिंदेचा रावडी लुक… राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘ख्वाडा’ आणि म्युझिकल लव्हस्टोरी असलेल्या ‘बबन’ चित्रपटानंतर ‘रौंदळ’मध्ये पुन्हा एकदा डॅशिंग भाऊसाहेब दिसणार आहे. त्याच्या जोडीला नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री मुख्य भूमिकेत रसिकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. सोशल मीडियावर ट्रेलर आणि गीत-संगीताला मिळालेला रसिकांचा प्रतिसाद पाहता ‘रौंदळ’ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

‘रौंदळ’ची निर्मिती भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी , कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गजानन नाना पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. टप्प्याटप्प्यानं वाढणारी उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम ‘रौंदळ’च्या ट्रेलरनं केल्यानंतर आता संपूर्ण चित्रपट रसिकांच्या दरबारात सादर होणार आहे. या चित्रपटातील ‘मन बहरलं…’, ‘भलरी…’ आणि ‘ढगानं आभाळ…’ ही गाणी अगोदरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. हर्षित अभिराज यांनी डॅा. विनायक पवार, बाळासाहेब शिंदे आणि सुधाकर शर्मा यांनी लिहिलेल्या गीतांना सोनू निगम, जावेद अली, स्वरूप खान, दिव्य कुमार, वैशाली माडे, हर्षित अभिराज, गणेश चंदनशिवे यांच्या आवाजात स्वरसाज चढवला आहे. महाराष्ट्राच्या अस्सल लाल मातीतील खरीखुरी वाटणारी साहसदृश्ये या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॅाईट मानला जात आहे. नव्या जुन्या कलाकारांची तगडी फळी कथानकातील प्रत्येक व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यासाठी सक्षम आहे. या चित्रपटातही राजकारणाचे वेगळे पैलू पहायला मिळणार आहेत. हे राजकारण आहे प्रत्येक गावातलं, साखर कारखान्याच्या निवडणूकीतलं आणि त्या अन्यायाच्या विरोधात उभ्या ठाकणाऱ्या प्रत्येक नायकाचं… सत्ता आणि व्यवस्थेविरोधातील अनोखा लढा यात अधोरेखित करण्यात आला आहे. आपल्या आणि इतरांच्या न्याय-हक्कासाठी लढणारा नायक रसिकांचं मन मोहून टाकणारा आहे.

‘रौंदळ’मध्ये संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. डिओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी, तर फैझल महाडीक यांनी संकलन केलं आहे. महावीर साबन्नावरनं सिंक साऊंड आणि डिझाईन केलं आहे. मोझेस फर्नांडीस या चित्रपटाचे फाईट मास्टर असून, गजानन सोनटक्के कला दिग्दर्शक आहेत. कोरिओग्राफी नेहा मिरजकर यांनी केली असून, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. समीर कदम यांनी मेकअप, तर सिद्धी योगेश गोहिल यांनी कॅास्च्युम्स डिझाईन केले आहेत. डीआय वॅाट स्टुडिओमध्ये आलं असून, या सिनेमाचे डीआय कलरीस्ट श्रीनिवास राव आहेत. व्हिएफएक्स सुपरवायजिंग सतिश येले यांनी केलं असून, माही फिल्म्स लॅबचे विक्रम आर. संकपाळे यांनी आॅनलाईन एडीटींग केलं आहे. या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक विक्रमसेन चव्हाण आहेत, तर कार्यकारी निर्माते मंगेश भिमराज जोंधळे आहेत.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »