• यावर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर
  • गुरुवार, दि. २ फेब्रुवारी रोजी मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे आयोजित महोत्सवाच्या उदघाटन समारंभात होणार पुरस्कारांचे वितरण

पुणे : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत प्रदान करण्यात येणारा ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ यंदा ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री मनोजकुमार व प्रसिद्ध संगीतकार इनॉक डॅनियल यांना जाहीर झाला आहे. याबरोबरच यावर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ हा प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. हे सर्व पुरस्कार गुरुवार दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता मुकुंदनगर येथील थिएटर अकादमीच्या सकल ललित कलाघर येथे आयोजित महोत्सवाच्या उदघाटन समारंभात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी कळविली आहे.

भारतीय चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी मनोजकुमार आणि इनॉक डॅनियल यांना पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड फॉर आऊटस्टॅडिंग कन्ट्रिब्युशन टू इंडियन सिनेमा’ने सन्मानित केले जाणार आहे. आपल्या अभिनयाने दीर्घकाळ रसिकांच्या मनावर राज्य केलेले मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटात विविध भूमिका गाजविल्या आहेत. अभिनयाव्यतिरिक्त चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही त्यांनी योगदान दिले आहे. तर मूळचे पुण्याचे असणारे इनॉक डॅनियल यांनी तब्बल सहा दशके हिंदी चित्रपट सृष्टीसाठी संगीतकार व संगीत दिग्दर्शक म्हणून आपले योगदान दिले आहे. त्यांनी भारतात तसेच परदेशातही अनेक दिग्गज कलाकारांसमवेत काम केले आहे.

पिफ अंतर्गत २०१० सालापासून दिला जाणारा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ हा पुरस्कार यंदा गायिका उषा मंगेशकर यांना दिला जाणार आहे. भारतीय चित्रपट संगीतातील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. मंगेशकर यांनी ‘सुबह का तारा’ या चित्रपटातील ‘बडी धूमधाम से मेरी भाभी आई’ या गीताद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर अनेक चित्रपटासाठी त्यांनी गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, भोजपुरी, नेपाली, आसामी आणि कन्नड़ अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, गायिका प्रियंका बर्वे हे सहकलाकारांसह गायन सादर करतील. तर अभिनेत्री आणि नृत्यांगना शर्वरी जमेनीस आणि सहकलाकार नृत्य सादर करतील. या समारंभानंतर सायंकाळी ७:३० वाजता अली अब्बासी यांनी दिग्दर्शन केलेली फिल्म ‘होली स्पायडर’ ही महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविण्यात येणार आहे.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »