पुणे : ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि संशोधक पं. विजय श्रीकृष्ण जकातदार यंदा ७५ व्या वर्षात पर्दापण करत आहेत. यानिमित्त बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फलज्योतिष सभासद मंडळातर्फे पं. विजय जकातदार यांचा अमृत महोत्सव सत्कार सोहळा रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पं. विजय जकातदार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिवपार्वती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. मो. स. गोसावी भूषविणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून शाहू मोडक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभाताई शाहू मोडक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला डॉ. वा.ल. मंजूळ, चंद्रकांत शेवाळे, प्रा. रमणलाल शहा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रा. जवाहर मुथा आणि मोहन दाते यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० (नऊ) वाजता बालगंधर्व रंगमंदीर, पुणे येथे होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि पगडी असे या सत्काराचे स्वरूप असून यानिमित्त ज्योतिषशास्त्र हितचिंतकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पं. विजय जकातदार हे ख्यातनाम भविष्यकार पं. श्रीकृष्ण जकातदार यांचे चिरंजीव असून त्यांनी वडिलांचा वारसा अधिक समृद्ध केला आहे. वडीलांनी स्थापन केलेल्या मंडळाच्या कार्यात अमूलाग्र बदल करून त्यांनी मंडळाचा विस्तार केला. महाराष्ट्रसह देशात २१ शाखा स्थापन करून ज्योतिषाचा प्रसार आणि प्रचारव्दारे हजारो विद्यार्थी निमार्ण केले आहेत. ज्योतिष शास्त्राच्या प्रचारार्थ आणि प्रसारार्थ ज्योतिष ओनामा हे मासिक काढून त्यांनी ग्रंथनिर्मिती केली. मुख्यतः ज्योतिषाच्या अभ्यासाला त्यांनी संशोधनाची जोड दिली. शेकडो शोधनिबंध तयार केले. तसेच भविष्य कथनाची नवीन शैली त्यांनी विकसित केली. समुपदेशन करणारा भविष्यकार म्हणून त्यांची ख्याती आहे.

पं. विजय जकातदार यांच्या सत्कार सोहळ्याला सर्व ज्योतिषी आणि ज्योतिषप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार आणि आशय फिल्म क्लबचे सतीश जकातदार यांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »