उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे


पिंपरी : मोठा हिंदुत्ववादी कोण, हा मुद्दा बहुसंख्यांक मते आकर्षित करण्यासाठी पुढे आणला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून पुढे यावे आणि राज्यातील नागरिकांना दिलासा द्यावा. भाजपाचे केंद्र सरकार 50 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन संसद भवन आणि राष्ट्रपती भवन उभारत आहे. या नवीन इमारतीत नवीन संविधान आणण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. त्याच उद्देशाने पुन्हा पुन्हा मंदिर मशीद वाद उकरून काढला जात आहे. देशातील शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचार, महागाई, पाणी या मुद्द्यांवरील लक्ष विचलित करण्यासाठी भोंग्याचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला जात आहे अशी टीका महाराष्ट्र व मुंबई प्रदेश समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी पिंपरी येथे केली.


रविवारी (दि. २२ मे २०२२) पिंपरी येथे समाजवादी पार्टीचे शहर उपाध्यक्ष बी. डी. यादव यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अबू आझमी यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, शहर प्रभारी अनिस अहमद, शहर उपाध्यक्ष बी. डी. यादव, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रवी यादव, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कमलेश यादव, शहर प्रवक्ता नरेंद्र पवार, महासचिव प्रदीप यादव, शहर संघटक रवींद्र यादव आदी उपस्थित होते.


यावेळी अबू आझमी म्हणाले की, देशातील एकंदरीत परिस्थिती भयानक आहे. भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम विषयावर बोलतात, परंतु विकासावर बोलत नाहीत. त्यांनी मंदिर मशीद वादामुळे संविधान धोक्यात आणले आहे. बाबरी मशिदीचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशातील मुसलमानांनी स्वीकारला त्याचा आदर केला. पण आता ज्ञानवापी मशिदीचा नवीन वाद पुढे आणला जात आहे.
भारतीय जनता पार्टी बाबत काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य बरोबर आहे. आगामी काळात भारतात नरसंहार होण्याची भीती आहे. यामध्ये सर्वांचेच नुकसान होईल. दलितांचे आरक्षण आणि मुस्लिमांचा अल्पसंख्याकांचा दर्जा संपवण्याचा यांचा कुटील डाव आहे. आरक्षणाचा उपयोग वंचितांना होत आहे. परंतु देशात रेल्वे सारखे मोठे सार्वजनिक उद्योग विकले जात आहेत. नोकऱ्या कमी होत आहेत. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आरोग्य, पाणी या समस्यांवरील नागरिकांचा रोष व्यक्त होऊ नये, म्हणून, विनाकारण पुन्हा पुन्हा हिंदू मुस्लिम आणि मंदिर मशीद तसेच हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला जात आहे.

महाविकासआघाडी ला समाजवादी पार्टीचा पाठिंबा आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळाचा निधी त्यांनी बंद केला आहे. इंधनावरील कर महाविकास आघाडी सरकारनेने कमी करावा. मुस्लिमांना ५ टक्के आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊ असे सांगून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. संसदेच्या मान्यतेशिवाय आणि आरक्षणाचा कोटा वाढवून दिल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही हे माहीत असतानाही केवळ मतांच्या टक्केवारीसाठी घोळ घातला जात आहे.

श्रीलंके सारखी भारताची परिस्थिती होऊ नये, यासाठी सर्व नागरिकांनी तसेच सर्व पक्षांनी संविधानाचा आदर आणि पालन केले पाहिजे असेही आवाहन अबू आझमी यांनी केले. राज ठाकरे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे स्वतःच्याच राजकारणावर त्रस्त आहेत. राज ठाकरे यांनी जे पेरले तेच उगवणार आहे. “नफरत का जवाब नफरत से मिलेगा”. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे.
याबाबत त्यांनी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागावी अशी ही मागणी या पत्रकार परिषदेत अबू आझमी यांनी केली.
………………………

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »