- शरद पवार यांचे प्रतिपादन; जयदेव गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रज्ञावंताचा संघर्ष’ ग्रंथाचे प्रकाशन
पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले सबंध जीवन दलित, अस्पृश्य, शेतकरी, कामगार, स्त्रियांसह समाजातील उपेक्षित घटकांना समान न्याय व सन्मानजनक वागणूक मिळावी, यासाठी समर्पित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक असून, त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.
ऍड. जयदेव गायकवाड लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रज्ञावंताचा संघर्ष’ या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. पद्मगंधा प्रकाशन व लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ संपादक पत्रकार अरुण खोरे, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे, मयूर गायकवाड, निकिता गायकवाड आदी उपस्थित होते.
ग्रंथ निर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदानाबद्दल रवी मुकुल, पंडित कांबळे, नंदकुमार देवरे, अनुश्री भागवत, बालाजी एंटरप्रायजेसचे श्री दुधाने यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. अरुण खोरे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.
शरद पवार म्हणाले, ” समाजातील दलित, वंचित, अस्पृश्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. समर्पित भावनेने देशहितासाठी, प्रत्येक भारतीयाला समान अधिकार मिळण्यासाठी व समाजातील जातीनिर्मूलनासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या याच वैचारिक संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम ऍड. जयदेव गायकवाड यांनी या ग्रंथाद्वारे केले आहे. हा ग्रंथ सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांना अर्पण केला आहे, याचा आनंद वाटतो. जयदेव यांनी या दोन व्यक्तींची केलेली निवड व बाबासाहेबांचा जवळचा संबंध वाटतो.”
“कामगार, स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी अनेक कायदे केले. घटनेतही सर्वांना समान संधी, न्याय मिळेल यावर त्यांनी भर दिला. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आजही देश एकसंध आहे. त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. बाबासाहेबांवर प्रचंड लेखन विविध भाषेत झाले आहे. जवळ जवळ १८ खंडांचे बाबासाहेबांच्या विचारांचे ग्रंथ फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर अन्य राज्यांमध्येही महाराष्ट्र सरकारने केले आहे. तरीही आपण बाबासाहेबांना आपण न्याय देऊ शकत नाही. बाबासाहेब थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ होते. लंडन विद्यापीठात बाबासाहेबांनी वाचलेल्या प्रबंधाने खूप चर्चा झाली. कामगार हक्क, वेतन, रजा याचे निर्णय घेत त्यांनी कामगारांचे हित साधले. महात्मा फुलेंना दूरदृष्टी होती. त्याचा आदर्श बाबासाहेबांनी घेतला. जेथे अन्याय होतो तेथे संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली. बाबासाहेबांची नोंद अन्य देशांनीही केली आहे,” असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
बाबा आढाव म्हणाले, “आपण एकमेकांना दुरुस्त करण्यापेक्षा समोर आलेल्या आव्हानांना पेलण्यासाठी सज्ज व्हायला हवे. बाबासाहेबांनी देशाला दिलेली घटना पाळली जातेय का, याचा विचार गरजेचे आहे. आजची परिस्थिती पाहता आपण हिटलरला वेगळ्या शब्दात परत आणतो आहोत का याचा विचार करावा. सतत इतिहास उगळण्यात स्वारस्य नाही. देशद्रोह, सेक्युलर शब्दांवर सध्या चर्चा सुरू आहे. यात तरुण कुठे आहेत? समाजाचे चिंतन काय सुरू आहे, ते साहित्यात कसे उतरते आणि कलेच्या क्षेत्रात कसे उतरते ते महत्वाचे आहे. तरुणांबरोबर संवाद वाढवायला हवा.”
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, “जातीभेदाच्या विचारांना आव्हान देण्याचे काम १३ व्या शतकात सुरू झाले. संत चोखामेळा, संत नामदेव यांनी क्रांतिकारी विचार मांडले. विचाराच्या क्षेत्रातील ठराविक जातींची बंदी त्यांनी उठवून लावली. त्याचे शिखर बाबासाहेबांनी गाठले. बाबासाहेबांच्या विचारांनी नेमके काय केले हे एकत्रितपणे मांडणारे हे पहिले पुस्तक आहे. बाबासाहेब फक्त बहुजन समाजाचे नाही, तर समस्त स्त्री, पुरुष, सर्व जाती धर्माचे नेते होते. जाती व्यवस्थेचा अंत करणे, अंतरात जाती संपवण्याचा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. चळवळी विचारांच्या स्तरावर असणे आवश्यक आहे.”
जयदेव गायकवाड म्हणाले, “दोन अडीच वर्षाच्या सखोल अभ्यासातून निर्मिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन पवार साहेबांच्या हस्ते होतेय, याचे समाधान वाटते. आंबेडकरी विचार समजून घेत तसे वागायला हवे. शब्द, चित्रांच्या पलीकडचे ते व्यक्तिमत्व आहे. तो एक विचार आहे. सवंग बाबासाहेब वाचताना त्यांच्यासोबत झालेले राजकारण कोणासोबत तरी मांडावे अशी गरज वाटू लागली. मग हा ग्रंथ लिहावा वाटला. बाबासाहेबांच्या विचारांचा सर्वंकष विचार करण्यासाठी खोलवर विचार करणे गरजेचे आहे.”