
पुणे : नवीन वर्षातील पहिला सण ‘संक्रांत’ तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा आणि सोबत गोड बोलण्याचा संदेश घेऊन येणारा सुगीचा सण.
संक्रांत भौगोलिक दृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमण आणि उत्तरायण आरंभ यामुळे उत्तर गोलार्धात तिळातिळाने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते. म्हणूनच जागतिक भूगोल दिन ठरण्याचा मान मकरसंक्रांतीला मिळाला आहे. गेले वर्षभर कोरोना वैश्विक महामारीने त्रस्त झालेल्या, अनेक प्रियजनांना गमावलेल्या आपल्या उदास, विषन्न मनाला संक्रांतीचा सण उभारी देऊन गेला. विषाणूजन्य रोगावर जिद्दीने मात करण्यासाठी धाडसी कोविडयोद्धे उभे ठाकले. कोविडयोद्धांचा, त्यातही महिला कोविडयोद्धांचा यथोचित मानसन्मान करून संक्रांतीचे वाण लुटण्याचा अनोखा उपक्रम पुणे मनपाच्या कार्यक्षम नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी घेतला.

कार्यक्रमाच्या पोस्टर मधील तिळगुळ घ्या गोड गोड बोला… एक झाड लावा प्रदुषण टाळा…! घेऊया वृक्ष लावण्याचा ओवसा… उमटवूया पर्यावरण वाचविण्याचा ठसा…! या दोन पर्यावरणरक्षक चारोळ्यांचा जो अर्थ होता, त्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम पार पडला.



प्रभाग क्रमांक ३५ क येथील वाळवेकर उद्यान येथे संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी २०२१ रोजी महिला कोविडयोद्धांचा मानसन्मान करण्याचा आणि तुळशीची रोपे लावून वाण लुटण्याचा कार्यक्रम आयोजित केला.
कोरोना लॉकडाऊन काळात सर्व पोलिस बंधू-भगिनींनी सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या जीवाची बाजी लावली. महिला पोलिस कोविडयोद्धा म्हणून पोलिस किरण मदने (सहाय्यक पोलिस निरीक्षक, सहकारनगर पोलिस स्टेशन, पुणे शहर), शितल राजपूत व वृषाली जेधे यांचा ‘#यशश्री_सुरक्षारत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

शहरातील दैनंदिन स्वच्छतेचे काम नेटाने करणाऱ्या महिला सफाई कर्मचार्यांची सेवा कधीही न विसरणारी आहे. स्वछता सेवक महिला कोविडयोद्धा म्हणून विद्याआण्णा नाईकनवरे, वंदना लोंढे, लंका ठाकूर, शारदा शिंदे, रेणुका शिरसट यांना ‘#यशश्री_सेवारत्न’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
लॉकडाऊन काळातही भाजीपाल्याची कमतरता भासू न देणारे अनेक भाजी विक्रेते कोणतीही पर्वा न करता कार्यरत होते. कृषीकन्या कोविडयोद्धा म्हणून मंदाकिनी काळे, छाया मैदाने व मनीषा मारणे यांना ‘यशश्री_कृषीरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आपल्या आयुष्यातील प्रसारमाध्यमांचे महत्त्वपूर्ण स्थान लक्षात घेऊन कोरोना काळात नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणाऱ्या पत्रकार बंधू-भगिनींच्या कार्याची तोड नाही. पत्रकार महिला कोविडयोद्धा म्हणून राजश्री अतकरे-पवार (द पब्लिक व्हॉइस) व अंजली खमितकर यांना ‘यशश्री पत्रकाररत्न’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आरोग्यसेविका डॉ. दिपाली वांद्रे, डॉ. शैलजा राऊत, डॉ. स्वाती जगताप व डॉ. प्रियांका काकडे यांचा त्यांच्या विशेष योगदानानिमित्त ‘यशश्री_आरोग्यरत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पुरस्कार प्राप्त कोविडयोद्धांच्या हस्ते वाळवेकर उद्यान येथे तुळशीची रोपे लावण्यात आली. कोरोना काळात जनसेवेचे अखंड व्रत घेतलेल्या या कोविडयोद्धांच्या प्रशंसनीय कार्याचा केलेला हा गौरव खरोखरच यथोचित आहे.

या कार्यक्रमानिमित्त दिलेल्या संदेशात अश्विनी ताईंनी स्त्रीशक्तीचे अनन्यसाधारण रूप स्पष्ट केले. “महिलांनीच महिलांची शक्ती व्हावे, एकमेकांना सहकार्य करून या यशशिखराच्या दिशेने वाटचाल करावी”, असे अश्विनीताई म्हणाल्या. संक्रांतीला लुटलेल्या हा अनोखा वाणवसा नित्यस्मरणीय राहील.

सोनम पाटील (संचालिका-Aicon) व राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष श्री. गिरीष परदेशी यांची उपस्थिती लाभली आणि याच कार्यक्रमाचे औचित्य साधून अश्र्विनीताईंच्या संकल्पनेतून लोकहितार्थ साकारण्यात आलेल्या पुणे मनपा संयुक्त प्रकल्प डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरचे जे पुणे शहरातील एक अत्याधुनिक आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाते, त्याच्या दिनदर्शिकाचे उद्घाटन सन्मानप्राप्त कोविडयोद्धांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
