पुणे : कोविड 19 लसीकरण मोहीम लवकरच जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या लसीकरण मोहीमेकरीता प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज सांगितले. मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज भेट देऊन पहाणी केली. तसेच कोविड 19 लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून ड्राय-रन (रंगीत तालीम) ही घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, लसीकरण प्रभारी डॉ. सचिन एडके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख म्हणाले, कोविड 19 लसीकरण मोहीम केंद्र शासनाकडून लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून ड्राय-रन (रंगीम तालीम) घेण्यात आली आहे. ही रंगीत तालीम घेतांना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण आलेली नाही.
लसीकरणाचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याने प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी आरोग्य विभागामार्फत कोणत्या सोयी सुविधा पुरविण्यात येणार याची माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे जे काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करणार आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा औषध साठा, मनुष्यबळ उपलब्ध आहे.
आरोग्य विभागाने चांगले नियोजन केलेले आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून कुठल्याही प्रकारे अडचण येणार नसल्याचेही जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी ही मोहिम राबवितांना कोविड 19 लसीकरण केंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची यावेळी माहिती दिली. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.