भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे जिल्ह्यात भव्य आनंदोत्सव
पुणे : मोदी सरकारच्या कृषी कायद्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. या कायद्याच्या विरोधात राजकीय हेतूंनी सुरु असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भाजपाने शेतकरी संपर्क मोहीम सुरु केली. सामान्य शेतकरी या कायद्याविरोधातील अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ₹ चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.
नव्या कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी भाजपा किसान मोर्चातर्फे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आयोजित केलेल्या वरवंड ते चौफुला ट्रॅक्टर यात्रा कार्यक्रमात पाटील बोलत होते. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे , यात्रेचे संयोजक , किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेवनाना काळे , आ . राहुल कुल , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले की , मोदी सरकारच्या 3 कृषी कायद्यांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. मात्र यामुळे बाजार समित्यांवरील अवलंबून असणाऱ्या अनेक हितसंबंधी मंडळींचे अर्थकारण बिघडणार आहे. म्हणून या कायद्याविरोधात ओरड सुरु झाली आहे. या कायद्याचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने शेतकरी संपर्क मोहीम हाती घेतली आहे. शिवार संवाद सारख्या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना या कायद्याचे फायदे समजावून सांगितले जातील.
किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री डॉ . अनिल बोन्डे यांनी नव्या कृषी कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत शेतीचे उत्पादन वाढविण्याबाबत बोलले गेले, मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबाबत कोणीच बोलत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने या कायद्याच्या रूपाने निर्णायक पाऊल टाकले गेले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना कोठेही आपला शेतीमाल विकता यावा यासाठी मनमोहन सिंग सरकारने कायद्याचे प्रारूप तयार केले होते. या बाबत नेमलेल्या राज्यांच्या समितीचा तेंव्हाच पणन मंत्री म्हणून मी प्रमुख होतो. आता मात्र काँग्रेसची मंडळी केवळ राजकारणासाठी या कायद्यांना विरोध करत आहेत.
यावेळी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात अंकुश शेंडगे आणि अंकिता बारवकर यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.