एमआयटी डब्ल्यूपीयूत ऑनलाईन दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेचा समारोप

पुणे :“राजकारणामुळे देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकारणाचे क्षेत्र खूपच प्रभावीत झाले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, सीबीआय आणि पार्लमेंटला सुध्दा त्यांच्या अधिकारांचा पूर्ण वापर करतांना विचार करावा लागतो. अशा जात्यामध्ये माध्यमे कसे सुटू शकतील, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. माध्यमांकडून ज्या प्रकारे रिर्पोटिंग होत आहे त्यात शांती शोधणे अवघड आहे.” असे मत ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय ऑनलाईन, “दुसरी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषदेच्या” समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या परिषदेचा प्रमुख विषय जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका हा होता.


यावेळी ज्येष्ठ पत्रकार आशितोष, अरूणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व सुप्रसिद्ध लेखक तथागत रॉय, विवेकांनद इंटरनेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष आणि तुघलकचे संपादक स्वामीनाथन गुरूमुर्ती, ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा (पीव्हीएसएम, व्हीएसएम) आणि यूएस येथील इन्फीनेटी फाउंडेशनचे संस्थापक व लेखक राजीव मल्होत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र-कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू प्रा. डी.पी. आपटे व लिबरल आर्ट, फाइन आर्ट आणि मिडिया अ‍ॅण्ड जर्नालिझम स्कूलच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. अनुराधा पराशर हे उपस्थित होते.

पुण्यप्रसून वाजपेयी म्हणाले,“ सध्याच्या काळात पत्रकार संस्था ज्या प्रकारे काम करीत आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे संबंध असणे गरजेचे झाले आहे. समजा तुम्हाला वृत्तपत्र काढायचे असेल तर आरएनआयशी जवळीक हवी. ही झळ जवळपास देशातील सर्वच क्षेत्रात पोहचत आहे. टाटा कंपनीला मोठा नुकसान होत आहे, परंतू अंबानी आणि अडानी यांच्या सर्व कंपन्या फायद्यात आहे. त्याचप्रमाणे माध्यमांमध्ये सुद्धा असे घडतांना दिसत आहे.”

“ देशाला या सर्व गोष्टींपासून वाचवायचे असेल तर प्रशासन आणि पत्रकारांना समोर येणे गरजेचे आहे. तसेच, देशाला शिक्षित करावे लागेल. कारण विरोधी पार्टीचे नेते पार्लमेंटमध्ये गप्प बसलेले आहेत. मुख्य प्रवाहाचे संपादक देशात आज आपल्या कुवतीनुसार काही चांगले काम करतांनाही दिसत आहे. सध्याच्या काळात संपूर्ण जग हे भारतातील पर्यावरण, न्यूक्लियर मुद्दा आणि हुकुमशाही सत्तेकडे आ वासून पाहत आहेत आणि आम्ही ते भोगत आहोत. सध्या या देशात कोल्ड वॉर सुरू आहे, ते थांबविण्यासाठी माध्यमांनांच कठोर भूमिका घेऊन कार्य करावे लागेल.”


तथागत रॉय म्हणाले,“ देशातील शांतीसाठी माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. रोजच्या घटनांंची सत्य माहिती समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी करावे. तसेच, संकटाच्या काळात तटस्थ भूमिका पार पाडावी. चीन आणि पाकिस्तान या देशांची समस्या ही अवघड आहे. त्यामुळे मिडियाने सुदधा यांच्या संदर्भातील योग्य बातम्या दयावे.”


आशितोष म्हणाले,“ आरोग्य, आर्थिक चक्र आणि राष्ट्रीय सुरक्षा या तीन गोष्टी सध्याच्या काळात संपूर्ण जगात सुरू आहे. त्यामुळे माध्यमांनी आपली महत्वाची भूमिका पार पाडावी. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून चीनचा वाद, देशातील आर्थिक स्थिती आणि वाढती बेरोजगारी सारखे विषयांवर माध्यमात चर्चा होतांना दिसत नाही. हे लज्जास्पद आहे. पत्रकारितेला काय झाले हे कळत नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांनी आपले योग्य कर्तव्य पार पाडावे. देशाच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची हिम्मत पत्रकारांनी ठेवावी.”


राजीव मल्होत्रा म्हणाले,“भारतीय माध्यमांनी संपूर्ण जगासमोर देशाची संस्कृती आणि चांगल्या राजकारणाचे दर्शन घडवावे. माध्यमांनी आपली वैचारिक पातळी वाढविण्यावर जोर द्यावा. कारण जागतिक स्तरावर पाहिले तर अलझझीरा, बीबीसी सारख्या माध्यमांसमोर आमची तुलनाच होऊ शकत नाही. देशातील माध्यमांमध्ये खळबळजनक, भावनीक, गंभीर विचारशीलता आणि शोध पत्रकारिता दिसत नाही, ही चिंताजनक बाब आहे. त्यांच प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकारिताही दिसत नाही. अशा वेळेस पत्रकारांना पूर्ण पणे विकसित व्हावे लागेल. त्यासाठी अभ्यास, संशोधन आणि तपस्या करावी.”


ले. जनरल अरविंदर सिंग लाम्बा म्हणाले,“ माध्यमे हे एक शस्त्र असल्याने पत्रकारतेची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. 1965 च्या लढाईच्या वेळेस पत्रकार आणि माध्यमांनी चांगली भूमिका बजावली होती. आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक मजबूती देण्यासाठी मुख्य प्रवाहातील वृत्तपत्र आणि मॅगझिन यांचे महत्व अनन्यसाधारण असते. माध्यमांनी प्रपोगंडा पसरू नये, तर ज्ञानाचा विकास करा. देशाच्या विकासाठी माध्यम आणि पत्रकारिता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतात.”


डॉ. विश्वनाथ दा कराड म्हणाले,“ कोरोना व्हायरसमुळे जगात भितीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या 6 महिण्यांपासून लोक घरात बंद आहे. अशा वेळेस सकारात्मक मानसिकता ठेवेणे गरजेचे आहे. या काळात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. 21 व्या शतकात भारत विश्व गुरू कसा बनेल या वर माध्यमांची आपली भूमिका मांडायला सुरूवात करावी.”
स्वामिनाथन गुरूमुर्ती यांनी समयोचित विचार व्यक्त केले.

प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले तसेच, प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसचालन केले.  प्रा.डॉ. अनुराधा पराशर यांनी आभार मानले.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »