
समाजसेवेची पंधरा वर्षांची परंपरा जपत मराठवाडा जनविकास संघाने यावर्षीही दिवाळीचा पहिला मान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सफाई कर्मचारी व आरोग्य सेवक, पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना दिला. ‘आनंदाची दिवाळी, अगोदर कष्टकरी कामगार वर्गाची’ असे म्हणत पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बेसिक पिन्सिपल वेस्ट व्हेंचर कंपनीचे कर्मचाऱ्यांना साड्या, कपडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

पिंपळे गुरव येथे मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार , मनोज मोरे, धनाजी येळकर, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी, अर्जुन खामकर, किशोर आटरगेकर, बळीराम कातंगळे, सतीश काळे, बालाजी पांचाळ, अनिताताई पांचाळ, राजेश सातपुते, शिवाजीराव घोडके, गोरख पाटील, लक्ष्मण जाधव, दिलीपराव बारडकर, महादेव करडे, सोमनाथ वैद्य, राहुल कांबळे, शाहूराज कदेरे आदी उपस्थित होते.

ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज म्हणाले, ज्यांच्या हातात झाडू आहे, त्यांच्याच हातात शहराचे आरोग्य आहे. त्यांच्यासाठी दिवाळीचा पहिला मान देणे ही खरी समाजसेवा आहे.
अरुण पवार म्हणाले, कष्टकऱ्यांचे जीवन सन्मानाचे व्हावे, ही आमची तळमळ आहे. समाजाच्या या आधारस्तंभांना आधार देणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.
प्रास्ताविक वामन भरगंडे यांनी केले. त्यांनी गेल्या १५ वर्षांत संघाने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत कर्मचाऱ्यांच्या सन्मानाची परंपरा अधोरेखित केली.
आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

