
सांगवी विकास मंचच्या वतीने महाआरतीचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुण पिढीमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने जुनी सांगवीतील सांगवी विकास मंचच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती पार पडली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

जुनी सांगवीतील शितोळेनगर येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी, फुलांनी सजविण्यात आला होता. यावेळी ह.भ.प. बब्रुवान महाराज वाघ, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष ईश्वरलाल चौधरी, नारायणराव भागवत, पश्चिम सांगवी जेष्ठ नागरिक संघाचे प्रकाशराव देशमुख, सांगवी विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष महेश भागवत, ओंकार भागवत, तसेच युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन केले.
ह.भ.प. बब्रुवान महाराज वाघ म्हणाले, की ही महाआरती श्रद्धा, प्रेरणा व एकतेचे प्रतीक आहे. शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे ध्येय आहे.
आयोजक ओंकार भागवत यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे लोक एकत्र येऊन महाराजांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सायंकाळी ७.३० वाजता महाराजांची आरती केली जाणार आहे. हे आरती केंद्र युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आहे.

