आरोपीवर १०३ गुन्ह्यांची नोंद
पिंपरी : (राजश्री आतकरे )
घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिक हैराण झालेले असताना, सांगवी पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत घरफोड्या गुन्हेगाराला जेरबंद केले आहे. अटकेनंतर आरोपीकडून तब्बल २५ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक घरफोड्या प्रकरणांचा उलगडा झाला आहे.
अटक आरोपीचे नाव जयंत उर्फ जयवंत गोवर्धन गायकवाड असे असून तो कुख्यात सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीच तब्बल ४४ घरफोड्यांचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस तपासात आणखी ५३ गुन्ह्यांची माहिती समोर आली असून, यामुळे आरोपीवरील गुन्ह्यांची संख्या आता १०३ वर पोहोचली आहे.
सीसीटीव्हीने लपवता आला नाही गुन्हा
सांगवी पोलिसांचे तपास पथक घरफोडीच्या मालिकेचा छडा लावत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. चौकशीत आरोपीने सांगवीसह पिंपरी, चिंचवड, दापोडी, भोसरी आणि पुणे शहरातील विविध भागात घरफोड्या केल्याची कबुली दिली.
उघडकीस आलेले गुन्हे
🔹 सांगवी पोलीस ठाणे – ६ गुन्हे
🔹 दापोडी, भोसरी पोलीस ठाणे – प्रत्येकी ४ गुन्हे
🔹 भारती विद्यापीठ, विमानतळ, सहकारनगर पोलीस ठाणे – १३ गुन्हे
🔹 येरवडा, कोथरूड, हडपसर, वाकड, विश्रांतवाडी, बुड्रुक, चिंचवड, निगडी आदी ठिकाणीही गुन्हे नोंद
एकूण ४४ गुन्हे उघडकीस, तर ५३ नव्याने समोर आलेले असल्याने आरोपीविरोधातील प्रकरणे १०३ वर पोहोचली आहेत.
पोलिसांची कामगिरी
ही कारवाई पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, उपआयुक्त शिवाजी पवार, उपआयुक्त संदीप आतले, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.
नागरिकांना दिलासा
घरफोड्यांच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र या कारवाईमुळे पोलिसांबद्दलचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. सराईत गुन्हेगाराला अटक करून पोलिसांनी शहरातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला असून, येत्या काळात घरफोड्या प्रकरणांत घट होण्याची शक्यता आहे.
