
पिंपरी : ऑनलाइन फूड डिलिव्हरीसाठी बनावट (फेक) आयडी वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांनीच हल्ला केल्याची घटना पिंपळे गुरवमधील कल्पतरू हाऊसिंग सोसायटीजवळ घडली. ही घटना मंगळवारी (दि. १६) सायंकाळी उघडकीस आली.
तक्रार दाखल
या प्रकरणी मंगेश रमेश मुंडे (वय २०, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात हर्बद खर्बान व त्याचे काही मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेचा प्रकार
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी डिलिव्हरीसाठी थांबले असताना आरोपीने फेक आयडी वापरून ऑर्डर दिली होती. त्याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने हातातील लोखंडी कडे फिर्यादीच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली.
तसेच, फिर्यादीचे मित्र अमीत गुप्ता आणि सचिन जाधव यांनाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली.
पुढील तपास
या घटनेची नोंद सांगवी पोलिस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.