
.
पुणे : प्रसिद्ध वैज्ञानिक, संशोधक आणि साहित्यिक डॉ. नीलकंठ मालाडकर (वय ९१) यांचे रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने विज्ञान व साहित्य क्षेत्रातील एक प्रकाशमान दीप विझला आहे.

डॉ. मालाडकर यांनी बायो-केमिस्ट्री विषयात पीएच.डी. मिळवली होती. त्यांनी हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लि., पिंपरी तसेच एमगोल्ड एनर्जिया प्रा. लि. येथे संशोधन संचालक म्हणून काम पाहिले. त्यांच्या संशोधनातून टेट्रासायक्लिन, हॅमायसिन, सेफालोस्पोरिन्ससह अनेक जीवनावश्यक अँटिबायोटिक्स तसेच विविध अमिनो ॲसिड्सचे संश्लेषण घडवून आणण्यात मोठा हातभार लागला. तसेच जंगलात उगवणाऱ्या कंदमुळांपासून डेक्स्ट्रोज आणि इथेनॉल निर्मितीची पेटंट प्रक्रिया त्यांनी विकसित केली.


“शास्त्रज्ञ कधीही निवृत्त होत नाही” या विचारावर विश्वास ठेवून व्यावसायिक आयुष्यानंतर त्यांनी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय अंगीकारले. प्रीत रंगली सागरी (तेल शोध मोहिमेवर आधारित कादंबरी – २००८), पृथ्वीच्या पोटी हिरे कोटी कोटी (कोळसा शोध मोहिमेवर आधारित), स्वानंदी (लघुकथा संग्रह), तसेच राजस (कविता संग्रह – एप्रिल २०२३, बाणेर, पुणे) यांसारखी साहित्यकृती त्यांनी वाचकांसमोर आणली. त्यांच्या लेखनातून विज्ञानाची जिज्ञासा व आश्चर्य सामान्य माणसापर्यंत पोहोचले.
त्यांच्या पश्चात पत्नी उज्वला (निवृत्त उपप्राचार्या, एचए स्कूल – प्रसिद्ध गणित व विज्ञान शिक्षिका), सुपुत्र समीर (रसायन अभियंता, शास्त्रज्ञ व उद्योजक), डॉ. मनीष (वरिष्ठ अध्यक्ष – अरिस्टो फार्मास्युटिकल्स लि.), सुना दीपाली व संगीता, नातवंडे उर्जा, काया व प्रीना असा परिवार असून असंख्य मित्रपरिवार व शुभेच्छुक आहेत.
त्यांच्या स्मृतींमध्ये केवळ एक विलक्षण वैज्ञानिकच नव्हे तर एक सज्जन, संवेदनशील व बहुआयामी व्यक्तिमत्त्व सदैव जिवंत राहील. त्यांच्या आत्म्यास श्रद्धांजली.