
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विशेष पथकाने एक मोठा गुन्हा उघडकीस आणत कुख्यात गुन्हेगार राघू सुप्या ऊर्फ राघू याला अटक केली आहे. या कारवाईत २ देशी बनावटीची पिस्तुलं आणि २ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. एकंदर जप्त शस्त्रसाठ्याची किंमत ₹१.०२ लाख इतकी आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेकभानु चौबे, उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय भोसले यांच्या नेतृत्वात पार पडली.
गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वाकड परिसरात सापळा रचून राघूला ताब्यात घेतलं. तो पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.
राघू सुप्या याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने हे बेकायदेशीर शस्त्र कोणाकडून घेतले याचा तपास सुरू असून, पुढे आणखी मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.


या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, मालमत्ता गुन्हे विशेष पथकाने फक्त सहा महिन्यांत १६ देशी पिस्तुलं व ३२ जिवंत काडतुसे हस्तगत करत पोलिस दलाच्या चतुराईचा ठसा उमटवला आहे.