
पुणे : “डॉ. जयंत खंदारे यांचे संशोधन जागतिक पातळीवर गाजेल, यात शंका नाही. त्यांनी लिहिलेलं ‘जनक शोधांचे’ हे पुस्तक अत्यंत मोलाचं असून, ते प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये पोहोचवणं गरजेचं आहे,” असं प्रतिपादन राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी केलं.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात डॉ. जयंत खंदारे लिखित ‘जनक शोधांचे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विश्वनाथ कराड (संस्थापक, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ) होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षदीप कांबळे (प्रधान सचिव, सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय), डॉ. हिरवानी, डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरु, पुणे विद्यापीठ), गणेश शिंदे, संरक्षण अभ्यास विभागप्रमुख डॉ. विजय खरे, आणि शशिकांत कांबळे (स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन) यांची उपस्थिती होती.

डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितलं, “उद्योग आणि शिक्षण यामध्ये दुवा नसल्याचं आपल्याला वेळोवेळी जाणवतं. केवळ जीडीपी नव्हे, तर संशोधनही तितकंच महत्त्वाचं आहे. या पुस्तकामुळे त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे.”


लेखक डॉ. जयंत खंदारे म्हणाले, “हे माझं तिसरं वैज्ञानिक पुस्तक आहे. यात विज्ञानाच्या इतिहासातील दिव्य क्षणांसोबतच गेल्या दोन दशकांतील ६० महान वैज्ञानिकांच्या कार्याचा अभ्यास केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण होणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे.”
गणेश शिंदे यांनी नमूद केलं, “आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनाची उणीव आहे. जोपर्यंत शिक्षणाला केवळ उदरनिर्वाहाचं साधन समजलं जातं, तोपर्यंत हा दृष्टिकोन विकसित होणार नाही.”
अध्यक्षीय भाषणात डॉ. कराड यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.
शशिकांत कांबळे यांनी प्रस्ताविक करताना सांगितलं, “विज्ञानामुळे मुलांमध्ये जागतिक दृष्टीकोन निर्माण होतो. ६० वैज्ञानिकांचं कार्य मराठीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, हे डॉ. खंदारे यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे.”
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन गौरीशंकर आनंद यांनी केलं.
फोटो ओळ – डॉ