योजनेतून फायदा झालेल्या महिलांविषयी माहिती देणारा असेल चित्रपट

महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या बऱ्याच योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. यापैकी काही योजना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे प्रकाशझोतात राहिल्या व जनतेला त्याचा फायदा ही झाला. ‘लाडकी बहिण’ योजना त्यापैकीच एक आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली हि योजना आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘लाडकी बहीण’ असे शीर्षक असलेल्या मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला आहे.

लाडकी बहीण चित्रपट

निर्मात्या शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे हे ओम साई सिने फिल्मच्या बॅनरखाली व शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. गणेश शिंदे यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. ‘लाडकी बहीण’ची पटकथा-संवादलेखन शितल शिंदे यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील कोट्यावधी माता-भगिनींच्या मदतीला धावून आलेल्या महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला. सातारा येथे सांस्कृतिक मंत्री श्री. आशिष शेलार यांनी ‘लाडकी बहीण’ सिनेमाच्या मुहूर्ताचा क्लॅप दिला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष पंकज चव्हाण, राजेंद्र मोहिते, अनंत काळे, महेश देशपांडे आणि तहसीलदार आदी मंडळी उपस्थित होती. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ असंख्य महिलांनी घेतला आहे. गोरगरीब जनतेच्या संसाराला हातभार लावत महाराष्ट्रातील महिला वर्गाचे आर्थिक सबलीकरण करणारी लाडकी बहीण योजना खूप गाजली. यावर चित्रपट तयार होणे हे अतिशय उत्साहवर्धक असल्याचे मत निर्मात्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. एक महत्त्वपूर्ण विषय अतिशय खेळकर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात येणार असून, ‘लाडकी बहीण’च्या रुपात परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट तयार करण्यात येत असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.

या चित्रपटामध्ये मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, जयश्री सोनवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. गजानन शिंदे या सिनेमाचे छायालेखक असून, संगीत विनीत देशपांडे यांचे लाभले आहे. गायक अवधूत गुप्ते तसेच आनंद शिंदे यांच्या आवाजात ‘लाडकी बहीण’मधील गाणी संगीतबद्ध करण्यात येणार आहेत. पंकज चव्हाण नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कबाडे, शिवाजी सावंत या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »