बेलराईज इंडस्ट्रीजचे ११.११ टक्क्यांच्या प्रमियमने लिस्टींग
पुणे : बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेड या पुण्याच्या कंपनीने शेअर बाजारात दमदार पदार्पण करत ११.११ टक्के प्रीमियमने लिस्टिंग केले आहे.
बीएसईवर कंपनीचा शेअर ९८.५० रुपयांवर सूचीबद्ध झाला, जो इश्यू प्राइसपेक्षा ९.४४ टक्क्यांनी जास्त आहे. तर एनएसईवर शेअरची नोंदणी १०० रुपयांवर झाली, जो ११.११ टक्क्यांचा प्रीमियम दर्शवतो. बाजार बंद होताना बीएसईवर शेअर किंमत ९७.३७ रुपये राहिली, तर एनएसईवर ती ९७.०८ रुपये होती. यानुसार अनुक्रमे ८.१९% व ७.८७% प्रीमियम शेअरने राखला. एनएसईवर पहिल्या दिवशी एकूण १९८५.०७ लाख शेअर्सची खरेदी-विक्री झाली, तर बीएसईवर २०१.७१ लाख शेअर्सची उलाढाल झाली. दोन्ही एक्स्चेंजवर मिळून एकूण उलाढाल २,१३५.७८ कोटी रुपयांवर पोहोचली.
बीएसईनुसार आजच्या (बुधवार) बंद भावानुसार कंपनीचे बाजार भांडवल ८,६६४.७५ कोटी रुपये होते, तर एनएसईनुसार ८,६३८.९५ कोटी रुपये होते. बेलराईज इंडस्ट्रीजने २१ ते २३ मेदरम्यान २,१५० कोटी रुपयांचा पब्लिक इश्यू खुला केला होता, ज्याला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हा इश्यू एकूण ४१.३० पट भरला गेला. संस्थात्मक गुंतवणूकदारांचा वाटा १०८.३५ पट भरला, तर बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ३८.३३ पट व किरकोळ गुंतवणूकदारांकडून ४.२६ पट भर घातली गेली.
बेलराईज इंडस्ट्रीज ही कंपनी दोन, तीन, चार चाकी वाहने, व्यावसायिक वाहने तसेच शेतीवाहनांसाठी सुरक्षितता महत्त्वाच्या असलेल्या यंत्रणा व अभियांत्रिकी उत्पादने तयार करते. कंपनीचे उत्पादन पोर्टफोलिओ यात मेटल चेसिस सिस्टम्स, पॉलीमर घटक, सस्पेन्शन सिस्टम्स, बॉडी-इन-व्हाईट घटक आणि एक्झॉस्ट सिस्टम्स यांचा समावेश आहे. ही उत्पादने पेट्रोल, डिझेल तसेच विद्युत वाहनांकरिता उपयुक्त असून, वाढत्या ईव्ही बाजारातही कंपनीची पकड मजबूत आहे.
कंपनीच्या पोर्टफोलिओत १,००० हून अधिक उत्पादने असून त्यामध्ये चेसिस सिस्टम्स, एक्झॉस्ट सिस्टम्स, बॉडी पार्ट्स, पॉलीमर घटक, बॅटरी कंटेनर्स, सस्पेन्शन आणि स्टीयरिंग कॉलम्स यांचा समावेश आहे.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कंपनीने आपले उत्पादन देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तारले आहे. ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया, युनायटेड किंगडम, जपान व थायलंड या देशांमध्ये कंपनीचे उत्पादन पोहोचते. कंपनीकडे २९ मूळ वाहन उत्पादक कंपन्यांचा विस्तृत ग्राहकवर्ग आहे.
बेलराईज इंडस्ट्रीजची बरेच वर्षांपासून देश-विदेशातील नामवंत वाहन उत्पादक कंपन्यांशी भागीदारी आहे. त्यामध्ये बजाज ऑटो, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया, हिरो मोटोकॉर्प, जग्वार लँड रोव्हर व रॉयल एनफिल्ड यांचा समावेश आहे.
मार्च २०२५ मध्ये कंपनीने एच-वन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जपानमधील सूचीबद्ध कंपनीच्या माजी उपकंपनीचे अधिग्रहण केले. त्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत कंपनीचे देशभरातील ९ राज्यांतील १० शहरांमध्ये एकूण १७ उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत.

Please follow and like us:
Pin Share

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »