
असं म्हणतात की राहू केतू हे बुद्धिभ्रष्ट करतात आणि माणूस चुकीच्या मार्गाने जातो. म्हणजे तो बेसावध असताना तो चुकीचे कर्म करतो!!
आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत, अमोल मोरे, अभिजीत मोरे, निलेश वांजळे, सुरेखा भोसले, आरती करंजवणे सुहास पवार, शंतनू पांडे, प्रदीप उदागे आदि कार्यकर्त्यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची काल दिनांक 6 एप्रिल रोजी भेट घेतली होती. त्यावेळेस अनेक बाबींचा उलगडा झाला. तब्बल तासभर सुशांत आपलं काळीज पिळवटून टाकणारे दुःख आणि घटना सांगत होते. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील पाच तासा दरम्यान काय काय झाले याची तपशीलवार माहिती त्यातून मिळाली. दरम्यान काही अहवाल आले असून आता आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सल्लागार डॉक्टर घैसास यांनी तणावामुळे राजीनामा दिला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिट अभावी प्रवेश मिळू न शकलेल्या गर्भवतीचा मृत्यू झाल्या प्रकरणी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डिन धनंजय टिळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि डिपॉझिट मागणे ही चूक आहे असे स्पष्टपणे मान्य न करता हॉस्पिटलच्या फॉर्म वरती डिपॉझिट हा रकानाच नाही तरीसुद्धा चौकोनात हा रकमेचा आकडा लिहिला गेला, हे राहू केतूमुळे म्हणजेच बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे लिहिले गेले असे डॉक्टर केळकर म्हणत आहेत. तोंडी मागणी करण्या ऐवजी बेसावध क्षणी लेखी मागणी केली गेली असाही याचा अर्थ होतो.
प्रत्यक्षामध्ये बऱ्याच हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट हे मागितले जाते आणि त्याची रक्कम पेन्सिलने लिहिली जाते. इमर्जन्सी असल्याने रुग्ण व त्याचे नातेवाईक अडचणीत असतात आणि ते काही करून पैसे जमा करतात व जीव वाचवण्यासाठी, मदत करण्यासाठी डॉक्टरांना आग्रह करतात हा नेहमीचा अनुभव आहे.


आम आदमी पार्टीचा विरोध या बेकायदेशीर कृत्यालाच आहे. लिखित स्वरूपात असो अथवा तोंडी स्वरूपात असो डिपॉझिट मागणे हे इमर्जन्सी पेशंटच्या बाबतीत होता कामा नये ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हीच जबाबदारी धर्मादाय हॉस्पिटल प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त आणि आरोग्य व्यवस्था सांभाळणारे आयुक्त व आरोग्य विभाग या सर्वांची आहे. आंदोलनादरम्यान आम आदमी पार्टी हीच मागणी लावून धरत होती.
यामध्ये आरोग्य विभाग हा तितकाच जबाबदार आहे कारण त्यातील प्रत्येक अधिकाऱ्याला या मागितल्या जाणार्या अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट ची माहिती असते. असे असतानाही ते त्यांची जबाबदारी पाळत नाहीत. यातूनच ते स्वतःसाठी एक पळवाट निर्माण करून ठेवतात. म्हणून आम आदमी पार्टी प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरावे अशी मागणी करीत आहे. आम आदमी पार्टी ची लढाई आरोग्य व्यवस्था परिवर्तांनासाठी आहे त्यामुळे पुढील काळात या विषया संबंधित काम पक्ष कार्यकर्ते हातात घेतील.