मोठ्या मताधिक्याने महाविकास आघाडीच्या विजयाचा संकल्प
चिंचवड, ता. ५ : पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने आयोजित स्नेह मेळाव्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह विविध घटक पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाची वज्रमुठ बांधत राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला. आकुर्डी येथील हॉटेल किरीयाडमध्ये हा स्नेह मेळावा संपन्न झाला.
यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी राहुल कलाटे यांचे स्वागत करून सन्मान केला. महाविकास आघाडीत काँग्रेसने कायम समन्वयाची भूमिका ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने प्रचाराचे नियोजन केले होते. विधानसभा निवडणुकीला देखील काँग्रेस पूर्ण ताकदीने माविआ उमेदवारांचा प्रचार करेल असे मत यावेळी कदम यांनी व्यक्त केले. तसेच काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विजयाचा संकल्प केला.
कार्यक्रमाला राहुल कलाटे यांच्यासह पिंपरी उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर, भोसरी उमेदवार अजित गव्हाणे, संग्राम तावडे, विष्णुपंत नेवाळे, श्यामला सोनवणे, बिंदू तिवारी, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, किशोर कळसकर, अमर नाणेकर, वाहब शेख, मयूर जयस्वाल, ॲड. अनिरुध्द कांबळे, अबूबकर लांडगे, सोमनाथ शेळके, हिरामण खवळे, जार्ज मॅथ्यू, शहाबुद्दीन शेख, ज्ञानेश्वर मलशट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीसोबत काँग्रेसने लोकसभेला देखील आघाडी धर्म पाळून मोठया निष्ठेने प्रचाराचे काम केले आहे. आताही विधानसभा निवडणूकीत सर्व घटक पक्षांसोबत प्रचारामध्ये आघाडीवर राहणार आहोत. आम्ही सर्वजण मिळून तिन्ही मतदारसंघांत प्रचारांमध्ये सक्रिय झालो आहे. महाविकास आघाडीला जिंकवण्यासाठी व राज्यात सरकार बदलवण्यासाठी जीवाचे रान करणार आहोत.
– डॉ. कैलास कदम, शहराध्यक्ष भारतीय काँग्रेस पक्ष
सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी धरून निर्णय घेणारे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी जिवतोडून काम करत आहेत. मी सर्वांचा मनस्वी आभारी आहे. त्याचप्रमाणे राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सुधरवण्यासाठी, महागाई, बेरोजगारी संपविण्यासाठी केवळ महाविकास आघाडीला आपण निवडावे.
– राहुल कलाटे
उमेदवार : महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष