पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना दिली आहे. त्याच धर्तीवर महिलांचा सन्मान आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आकुर्डी गावठाण येथे पिंक रिक्षा मधून प्रवास केला. या रिक्षाचे सारथ्य एका महिलेने केले.
शहरात महिला रिक्षा चालकांची संख्या वाढत आहे. यातून महिलांचे सक्षमीकरण होत असून कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढत आहे. महिला सक्षम झाल्याने कुटुंब देखील सक्षम होत आहेत. महिला चालक असलेल्या रिक्षाचा रंग गुलाबी ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत.
सध्या विधानसभा निवडणूक प्रचाराची धामधूम सुरू आहे. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी नुकताच आकुर्डी गावठाण परिसरात प्रचार दौरा केला. आकुर्डी गावठाण मध्ये त्यांनी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या. आमदार अण्णा बनसोडे यांनी आकुर्डी मधील प्रमोद कुटे यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर ते आकुर्डी गावठाण मधील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेले.
प्रमोद कुटे यांच्या घरापासून आकुर्डी विठ्ठल मंदिरापर्यंत त्यांनी महिला चालक असलेल्या पिंक रिक्षा मधून प्रवास केला. आमदार अण्णा बनसोडे यांनी रिक्षाचालक महिलेशी संवाद साधला. रिक्षा चालविण्याचे काम करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. तसेच संबंधित रिक्षाचालक महिलेचे अण्णांनी कौतुकही केले.